A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या छुगडीच्या बाहुलीचं

माझ्या छुगडीच्या बाहुलीचं लगीन, माझ्या छुगडीच्या

गोंधळ-गडबड लग्‍नाची घाई, माझ्या छुगडीला काय यात फुरसत नाही!
उणे नको जरा कुठे पडायाला काही, अशी वेळ पुन्हा कधी काही येणारच नाही!
काळजीमुळे कामामुळे, लग्‍नाच्या ह्या व्यापामुळे, पोर गेली हो थकुन

समोरच्या शुभाचा बाहुला नवरा, न्‌ वरमाई शुभा तिचा ठसका न्यारा!
छुगडीला राग तिचा पाहून तोरा, पण करते काय? तिचा बाहुला गोरा!
गोरा-गोरा बाहुला, त्याची सुंदर-सुंदर बाहुली, हा दिसतो जोडा कसा खुलुन

आमंत्रणं जाऊ द्यावी- ठायीठायी गेली, पाहुण्यांची गडबड आता घरी सुरु झाली!
मंडपही घातला न्‌ वाजंत्रीही आली, रोषणाई छानदार मंडपावर केली!
मानपान विहिणीला, कपडलत्ता खरेदीला, निघे छुगडी घाईनं

मायेपोटी माणसं सारी गोळा आता आली, मुंबईहुन आजोबा न्‌ गोंदियाची आत्या आली
पुण्याहुन भाऊ, वरणगावहून आजी आली, काका-काकू, मामा-मामी, मावशीही आली
जो-तो आता उत्सुकला, भरुनिया डोळा- सोहळा कधी पाहीन?

अत्तरदाणी, गुलाबदाणी, पान-सुपारीचा- मिलिंद, अभय, मंगेश यांनी बंदोबस्त केला!
पुष्पा, मिनू, मंजिरीने, हळदी-कुंकू याचा- व्यवस्थित! उणेपणा नाही येऊ दिला!
मंडपात दाटी झाली, मुहुर्ताची वेळ, चला लवकर, व्हा रे सावधान

अंतरपाट धरला बाहुली नि बाहुल्यात, हारतुरे तयार, अक्षताही मंडपात
मंगलाष्टकांनाही झाली आता सुरुवात-
(आता मंगल सोहळा, सुखद हा, कुर्यात सदा मंगलम्‌)
मंगलाष्टकांना झाली आता सुरुवात-, मधुनच भटजी काही मंत्र म्हणतात-
सावधान म्हणतात, टाळी-बँड वाजतात, अंतरपाट सारुन
गीत- शरद मुठे
संगीत - शरद मुठे
स्वर - शरद मुठे
गीत प्रकार - बालगीत
ठाय - स्थान, ठिकाण.