A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलिकडची नदिच्या थडिची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
सरघसरणिची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
अशि भुलवणिची हुलकावणिची
सागवेळूच्या भर रानींची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
जरा अडचणिची चढउतरणिची
घाटमाथ्याची ती पलिकडची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
इथची तिथची कधिं कुणिकडची
क्षितिजाकडची पुढची पुढची
मला आवडते वाट वळणाची
गीत - कवी अनिल
संगीत - आनंद मोडक
स्वर- अजय गोगावले
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- नोव्हेंबर १९४६, यवतमाळ.
थड - नदीचा तीर, किनारा.
पानबसणी - पाणी साचून राहते अशी दलदलीची सखोल जमीन.
लवण - पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा पाट फुटतो अशी जागा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.