A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन वढाळ वढाळ

मन वढाळ वढाळ
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरुनं येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पाण्यावरल्या रे लाटा

मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात?
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभाळात

मन जहरी जहरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, विंचू, साप बरा
त्याला उतारे मंतर!

मन एवढं एवढं
जसा खसखसचा दाना
अन्‌ मन केवढं केवढं?
त्यात आभाळ मायेना

देवा आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं?
कुठे जागेपनी तुला
असं सपनं पडलं!
आभायात - आभाळात.
ईज - वीज.
खाकस - खसखस.
चप्पय - चपळ.
जह्यरी - जहरी, विषारी.
ढोर - गाय, म्हैस, पशू.
तंतर - तंत्र.
मायेना - मावेना.
वढाय - ओढाळ.
वर्‍हल्या - वरल्या.
वहादन - जोराचा वारा / वावटळ.
मूळ स्वरुपात-

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्या रे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात
आसा कसा रे तू योगी?
काय तुझी करामत!

देवा आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं!