मनाचिया घावांवरी मनाची फुंकर
देह आंधळी कोठडी, बंदिवान झाले श्वास
इथे कुणी कोणाची का उगा धरायाची आस
वाटा वेगळाल्या वेड्या, वेगळ्या जाणार
मानभंग आधि-व्याधी, नाना व्याप-ताप
कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप
सुखे एकरंगी, दु:खे अनंत अपार
अधांतरी विश्वाचाही संसार पोरका
ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका
तोच बुडवितो, तोच तारूनि नेणार
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | पुढचं पाऊल (१९८६) |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, चित्रगीत |
आधि | - | मानसिक व्यथा. |
खरं म्हणजे मी सकाळच्या बैठकीला यायला उशीर केल्यामुळे ते अंमळ वैतागले होते. पण माझ्याकडून गीताचे शब्द ऐकल्यावर त्या वैतागाची जागा नेहमीच्या आणि ओळखीच्या मृदू हास्याने घेतली. हार्मोनियम पुढ्यात घेऊन त्यांनी गीताचा कागद फळीला लावला. एकदा एकाग्रपणे ते शब्द मनातल्या मनात वाचले. काही क्षण पेटीवर हाताची हलकी बोटं टाकत ओठांतल्या ओठांत पुटपुटल्यासारखे करीत स्वरांचा अंदाज घेतला. मग तबल्याला इशारा करून मंद भजनी ठेका सुरु केला आणि ते गीत प्रकट स्वरांत अथपासून इतिपर्यंत सरळ गात गेले.
प्रत्येक अंतर्याची अर्थानुरूप वेगळी स्वररचना करत आणि लयीच्या अंदाजाने अंतर्याच्या उच्चारांच्या वजनाचा वेगवेगळा विचार करत.
तिथे उपस्थित असलेले आम्ही सारे – विनय नेवाळकर, विजय मागीकर, अजित सोमण, आणि मी, नुसते पाहतच राहिलो. 'पाहणं' आणि 'ऐकणं' ह्या दोन भिन्न वाटणार्या क्रिया किती एकरूप आहेत ह्याचाच जणू प्रत्यय घेतला.
(संपादित)
सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.