A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मस्त ही हवा नभी

मस्त ही हवा नभी वाटते नवे नवे
तू जिथे तिथे तुझी धुंद मी तुझ्यासवे

स्पर्श हा तुझा प्रिया या जगांत या क्षणी
सौख्य अर्पितो मला अमृतात न्हाउनी
स्वप्‍न पाहता नवे पापणी हळू लवे

वेल बहरुनी वरी गंध फेकिते कळी
प्रीत याहुनी नसे या जगात वेगळी
हात हा तुझा सखे जोवरी न सोडवे

मुग्ध भावनेतले गीत आज रंगुनी
धुंद प्रीत आळवी वेगळ्या सुरांतुनी
अर्थ तोच शब्दही जे तुला मला हवे
लवणे - वाकणे.
संगीतकाराला एखाद्या गाण्याला चाल लावण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो पण ते सर्व कष्ट आनंद देऊन जातात. अशी काही जबरदस्ती नसते की तुम्ही रागदारीवर आधारित चाल लावली तरच गाणं चांगलं होईल. पण भारतीय संगीतातील रागांत इतक्या सुंदर गोष्टी आहेत की चाल लावताना काही वेळेला विचार करत बसण्याची वेळच येत नाही. ते स्वर ताबडतोब मदत करतात. चित्रपटात एखादा लढाईचा प्रसंग आहे, हजारो सैनिक हातात हत्यार घेऊन घोड्यावरून धावत आहेत. मी असं ऐकलं होतं की, पूर्वीच्या काळात अशा प्रसंगात हिंडोल रागाचा उपयोग करत. हिंडोल राग खरंच छान आहे. पण हल्ली हिंडोलच वापरतील असं नाही. त्याच प्रकारच्या वाट्टेल त्या स्वरांचा वापर करतील. म्युझिकमुळे व तालवाद्यांमुळे लढाईच्या दृष्याला उठाव मिळतो. इथे रागाचा काहीच संबंध नाही.

बर्‍याच संगीतकारांनी रागांवर आधारित बरीच गाणी बसवलेली आहेत. सुधीर फडके यांनी तर एकाच यमन रागावर कैक गाणी बेतलेली आहेत. ती सर्व गाणी सुंदर असून प्रत्येक गाणं वेगळं वाटतं. मी त्यापैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्या अनेक गाण्यामधे जास्तीतजास्त रागांचा उपयोग केलेला आहे. याच बरोबर मी असा विचार केला की आपण सर्व गाणी रागदारीवर बसवली तर तसा शिक्का माझ्यावर बसेल. आपल्याला असा छाप बसता कामा नये. मग काही गाणी कॉर्डस्‌ सिस्टीमवर तयार केली.

कुठल्याही पट्टीचा सा-ग-प पकडायचा अन्‌ त्यावर चाल बांधायची. शब्द जर तसे असतील तर चाल बरोबर सुचते. आता पाहा-
पांढरी एकचा स्वर पकडला तर त्याचा सा-ग-प काळी एकमध्ये रे-म-ध होईल. तेच काळी तीनमध्ये म-नि-रे होईल.
नुसत्या सा-ग-प वर कशी चाल बांधणार? तुम्ही सा-ग-प डोक्यात पक्का धरून ठेवायचा. मग नुसताच कुठेतरी एकटा बसलो असेन, तिथे मला सुचली तर तबला पेटी बरोबर नसताना तुम्ही कसं काय करणार? पण सर्व विचार डोक्यात असतात. तबलजी नसला तरी रूपकचा ठेका मनात चालू असतो. 'तिन्‌ तिना धिना धिना, तिन्‌ तिना धिना धिना'. मग फक्त मात्रा १-२-३-१-२-३-४ च्या आधारे मनात ताल चालू असतो. स्वरांचा भरणा डोक्यात असतोच. तसंच निरनिराळे कॉर्डस्‌ वाजत असतात. अशा पद्धतीने केलेलं माझं एक गाणं खूप लोकप्रिय झालं.
मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे
तू जिथे तिथे तुझी धुंद मी तुझ्यासवे

यात फक्त कॉर्डस्‌ आहेत. यात कुठल्याही रागाचा विचार केलेला नाही. तरी पण शेवटी जे संस्कार मनावर झालेले आहेत, त्याचा परिणाम म्हणून यात कुठेतरी रागाचा भास होईल. आम्ही जरी कॉर्डस्‌ पकडून गाणं केलं तरी सवयीप्रमाणे आम्ही त्याच पद्धतीने जाणार हे अपरिहार्य आहे.

'मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे' हे म्हणताना यात हमिंग कसं घ्यायला पाहिजे, ते कसं घेतलं तर आकर्षक वाटेल, या गोष्टीचा विचार एकट्या संगीत दिग्दर्शकाने करायचा असतो. शिवाय मधल्या म्युझिक पीसेसला कोणतं वाद्यं वापरायचं याचाही विचार तोच करतो.

हल्ली म्युझिक अरेंजर नेमण्याची पद्धत निघाली आहे. आमच्या काळात असं नव्हतं. अरेंज आम्हीच करायचं. आम्हीच सगळं गाणं बसवायचं. माझं कॉर्डस्‌ पद्धतीचं आणखी एक गाणं म्हणजे-
नकळत सारे घडले
मी वळता पाऊल अडले
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.