A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मस्त रात्र ही मस्त पवन

मस्त रात्र ही मस्त पवन हा मस्त चंद्र हा मस्त चांदणे
धुंद या क्षणी धुंद हो‍उनी धुंद जिवांचे धुंद वागणे

डोंगरमाथे उभे पलीकडे नदी खळखळे अशी अलीकडे
तिथेच वळत्या नदीतिरावर एक शिवालय उभे तेवढे
भवती हिरवागार किनारा हिरवळीचे ते मंद डोलणे

झुळुक चुळबुळे लाट खळखळे पाण्याखाली जाय पायरी
खुशाल भिजती त्यात पाऊले उन्मादक अन्‌ गोरी गोरी
भिजेल म्हणुनी वस्त्र रेशमी मधेच थोडे वर आवरणे

जागे नव्हते तिसरे कोणी जागे दोन्ही जीव तेवढे
हातामधले कंकण हलके किणकिणले मग मधेच थोडे
एकान्‍तावर अद्भुत जादू वरून पसरली त्या चंद्राने

मध्यरात्रीचा थंड गारवा सुंदर त्यातुन रात्र चांदणी
नाजुक बोटे कणखर मनगट यांचे हरपे भान त्या क्षणीं
निसर्ग निर्दय मानव दुबळा कुणी कुणाला मग सावरणे
उन्माद - कैफ / झिंग / धुंदी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.