A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माउली क्षमस्व गे

उभें पुढें लावण्य ठाकतां
रुद्ध कंठ बोलवे न आतां
सजल नयन पाताळ वेधतां
बोल अचानक प्रस्फुट झालें, मनाचियें राउळीं
माउली, क्षमस्व गे माउली!

ज्या स्‍त्रीसाठीं घडलें भारत
तिचा शाप पाप्यांना शासत
शुभाशिष तिचा सर्वां तारत
भारतीय मी कसा विसरलों, आगळिक जाहली
माउली, क्षमस्व गे माउली!

स्वर्गिय सुंदरतेचें प्राशन
करेल कोणी तर तें लांछन
जें शिव सुंदर त्याचें पूजन
करावया वांच्छितो पुत्र हा, घे साडी चोळी
माउली, क्षमस्व गे माउली!

आशेचा नच तुटला धागा
देव मानसीं असतो जागा
फुलवित मांगल्याच्या बागा
शिवसुमनांची वृष्टी घडतां माता गंहिवरली
माउली, क्षमस्व गे माउली!
गीत- श्रीराम आठवले
संगीत - गजानन वाटवे
स्वर - गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
आगळिक - मर्यादेचे उल्लंघन.
प्रस्फुट - फुललेले / विकसित.
राऊळ - देऊळ.
वांच्छा - इच्छा.