A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी एक तुला फूल दिले

मी एक तुला फूल दिले सहज नकळता
त्या गंधातून मोहरली माझी कविता !
त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता !

हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता !

का पान फूल लज्जेने चूर जाहले?
का सळसळत्या वार्‍याचे नूपुर वाजले?
त्या नूपुरांचे किण किण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता !

बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातून मोहरली माझी कविता !
कनक - सोने.
झरणी - ज्यात द्रवरूप शाई भरलेली असते आणि ती निबेतून झरेल अशी व्यवस्था केलेली असते ती एक प्रकारची लेखणी (फाउंटेन पेन).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.