A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी एकटीच माझी असते

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सार्‍या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी
गीत - सुरेश भट
संगीत - श्रीकांत ठाकरे
स्वर- निर्मला देवी
गीत प्रकार - भावगीत
गायिका निर्मलादेवी यांनाही मराठीतून गाऊन घ्यावं असं ठरवलं, पण त्या बाई राहत होत्या विरारला. आमचे मित्र टिपणीस, त्यांच्या पत्‍नी असे माझ्याबरोबर होते. पत्ता माहीत नव्हता, मग रूळ ओलांडून गेलो. तिथे विचारत विचारत एक झोपडपट्टी लागली. तिथे छोटी छोटी पत्र्याची घरं होती. एक केस असलेला पण टकलाला मैदान बनवलेला एक गंजी लुंगीमध्ये इसम दिसला. त्यालाच विचारलं, "निर्मलादेवी कहाँ रहती है?" त्यानं अदब न करता तोंड उघडलं, "यहाँ ही ।"
छोट्याशा दरवाजातून आत गेलो.

निर्मलादेवींकडे शिष्टाचार दिसला. "क्या काम है? बैठिये जी ।" "आपका रेकॉर्डिंग करना है ।" "कैसा?" मी म्हणालो, "ये रेकॉर्डिंग मराठी में करना है । आपने शोभा गुर्टूका रेकॉर्ड सुना होगा?" "जी हां, वो आपने बनाया? मैंने सोचा अरे ये तो शोभा है, कितना अच्छा गाती है ।"

मग सविस्तर बोलणं झालं. "मुआफ किजीएगा, मगर रिहर्सलके लिए आपको मेरे घर शिवाजी पार्क आना पडेगा । आवोगी आप?" उत्तर आलं, "जरूर, आऊंगी । पप्पू पता लिखके ले लो ।" पप्पूने विचारलं, "सांगा, शिवाजी पार्कला कुठे?" आम्ही सगळेच चाट पडलो. अस्खलीत मराठीत बोलत होता. पप्पू हा अभिनेता गोविंदाचा मोठा भाऊ कीर्ती. त्याने पडद्यावर कामं पण केलीत नि दिग्दर्शनही. त्यावेळी तो धडपडत होता. कधी गायचाही.

झालं. वेळ दिवस ठरला नि पप्पू एक दिवस आपल्या आईला घेऊन आला. पप्पूचा खूप उपयोग झाला. त्यांना नि मला वरचेवर इतक्या लांबचा पल्ला गाठता येणे शक्य नव्हतं. पप्पूला सर्व जबान याद करवून घेतलं. चुकलं की शब्दांसह तो घरी आईची रिहर्सल घ्यायचा. गोविंदा लहान ७ ते ८ वर्षाचा होता. पप्पू सात आठ वेळा तालमीला घेऊन यायचा. तेही विरारहून कारण त्यांचे उच्चार ठीक करून घ्यावे लागले.

जेव्हा रेकॉर्डिंग ठरले त्यावेळी पाऊस पडत होता पण बाई आल्या. एकदा अशाच पावसाच्या तालमीला आल्या असताना ताप भरला होता त्या वेळी डॉक्टरला बोलवावं लागलं. म्हणूनच चिंता होती.

सुरेश भटांनी एक गजल मला दिली होती. 'मी एकटीच माझी असते कधी कधी' जेवढं निर्मलादेवीच्या गळ्यातून निघेल त्या सगळ्यांचा उपयोग करून घेतला होता. एक गोष्ट मात्र कटाक्षाने टाळली होती. त्यांचा आवाज एका स्वरांवर स्थिर राहिला नाही. आवाजाला सारखी फिरकी होती. पण माझा आग्रह होता. "जरा सूर पे, गला हिलाई मत खडा सूर होना चाहिये ।" मग बाईने ऐकलं.
(संपादित)

श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.