A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी काट्यातून चालून

मी काट्यातून चालून थकले
तू घोड्यावर भरदारी
माझ्या ढोलावरी जीत ही
नगं दाखवू तू शिरजोरी

तू निमताला ढोल वाजवित
झिंग चढली मला न्यारी
डोंगरमाथा जिंकून आलो
बळ मुठीत या भारी

दिमाख नस्ता नगं दाखवू
घोड्यावरती येड्या थाटोनी
तू मावळचा राजा जैसा
मी ह्या मातीची महाराणी

नगं रुसू कस्तुरी तुझ्याविन
कशी जिवाची मनकरणी
घोड्यांच्या टापांनी उखरू
मावळमाथ्याचं पाणी

मी मर्दाची राणी झाले..

दोरीवरल्या झोपाळ्यांचा
झोका गेला गेला भिंगोरी
डोंगरमाथा कवेत घेऊ
सर्जा माझा राया माजोरी

मी वार्‍याशी बोलून आले..

ह्या शेताच्या मातीमधला
गंध पिकातून निखरोनी
हिरव्या झाडातुनी झळकली
लखलख तेजाची लेणी

मन पाखरू धुंद झाले..
भरदार - भरलेल्या अंगाचा, मजबूत बांध्याचा.
बाबासहेब पुरंदरे यांच्या 'शेलारखिंड' या कादंबरीवर रमेश देव यांनी चित्रपट काढायचा ठरवलं - 'सर्जा'.

किल्ल्यावर्ची ती तोफ. तिचा खिळा नष्ट केला तरच जय-विजय. सर्जा-कस्तुरीचं तोफ यशस्वी झाल्यानंतरचं प्रवासी प्रदीर्घ गीत. त्यात किती किती भरायला सांगितलं ! मला करावं लागलं. आठ मिनिटांचं गीत. असो.
पं.हृदयनाथ मंगेशकर, लतादीदी, पुन्हा शब्द, गीत-संगीत आणि ऋणानुबंधाने जोडलं जाणं. डोईचा पदर खांद्यावर न जाता पुन्हा डोईवर घेऊन तो भरजरी करावा एवढं शिकलो. गाण्याचं ते पथ्य पाळलं.

या लांबलेल्या आठ मिनिटांच्या गीताच्या शेवटी माझी नसलेली ओळ टाकली. कशासाठी तेही कळत नाही. 'मन पाखरू धुंद झाले'. मी असं कसं लिहिणार?
(संपादित)

ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.