A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी तर आहे मस्त कलंदर

जे जे सुंदर ते माझे घर
मी तर आहे मस्त कलंदर,
मस्त कलंदर हो!

अडलेल्यांना देतो हात
एखाद्याची करितो साथ
सुखदु:खी मी शांत राहतो
पुढेच जातो, गाणी गातो
श्रमुनी कमवतो माझी भाकर
मी तर आहे मस्त कलंदर,
मस्त कलंदर हो!

जीवन म्हणजे केवळ वाट
केव्हा उतरण केव्हा घाट
ध्येय ध्येयसे वाटे लोकां
चुकुन लाभते कोणा एका
म्हणून चालतो असा निरंतर
मी तर आहे मस्त कलंदर
मस्त कलंदर हो!

सहपथिकांनो डरता काय
उगीच डोळे भरता काय
चाले त्याचे भाग्य चालते
थांबे त्याचे दैव थांबते
उचला पाऊल उचला सत्वर
मी तर आहे मस्त कलंदर,
मस्त कलंदर हो!