A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भेटीलागीं जीवा लागलीसे

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहें ॥२॥

दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।
पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥

भुकेलिया बाळ अति शोक करी ।
वाट पाहे परि माउलीची ॥४॥

तुका ह्मणे मज लागलीसे भूक ।
धांवुनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥
आसवणे - आतुर, उत्सुक, आशायुक्त.
चकोर - चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी.
मूळचिठ्ठी - आमंत्रण.
भावार्थ-

  • देवा, माझ्या जिवास तुझ्या भेटीची फार इच्छा उत्‍पन्‍न झाली आहे. रात्रंदिवस मी तुझी वाट पहातो आहे.
  • पूर्णिमेचा चंद्र हे जसे चकोर पक्ष्याचे जीवन आहे तसेच माझ्या मनाला तुझी भेट हेच जीवन आहे. माझे मन तुझी वाट पाहते आहे.
  • दिवाळीच्या वेळी लेक जशी माहेराहून आईबापांचे बोलावणे येण्याची वाट पहाते, अगदी तशीच मी पंढरपुराची वाट पाहतो आहे.
  • भुकेलेले बालक आईकरिता फार शोक करते, तिची सारखी वाट पहात असते..
  • तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मला तुझ्या भेटीची फार भूक लागलेली आहे, तरी धावून ये. दर्शन देऊन भेटीची भूक नाहीशी कर.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.