A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मुलुख त्यात मावळी

धीरे जरा गाडीवाना रात निळी काजळी
मुलुख त्यात मावळी, मुलुख त्यात मावळी!

वाट चुके लवणाशी वळणाचा पेच पडे
डोंगराच्या डगरींना घाटाचा माठ जडे
दोन्ही बाजू दाट कुठे आंबराई जांभळी
मुलुख त्यात मावळी!

घुंगुराच्या तालावर सैल सुटे कासरा
खडकाशी चाक थटे बैल बुजे बावरा
पेंगुळता हादरती गाडीमंदी मंडळी
मुलुख त्यात मावळी!

करवंदी जाळिमंदी ओरडती रातकिडे
निवडंगी नागफणी आडविता चाल अडे
ठोकरली येथ गड्या बादशाही आंधळी
मुलुख त्यात मावळी!
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट- नरवीर तानाजी
गीत प्रकार - चित्रगीत
कासरा - बैलाच्या शिंगांस बांधण्याची दोरी.
डगर - डोंगराचा कडा / टेकडी.
थट - मिळणे.
माठ - किंचित उतरती जागा / चिकण माती असलेली जागा.
लवण - खोलगट जागा.