A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाच रे मोरा अंब्याच्या

नाच रे मोरा अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ
काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंब थेंब तळ्यांत नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत
खेळ खेळु दोघांत
निळ्या सवंगड्या नाच !

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
इरले - झाडांची पाने, कामट्या यांची केलेली टोपडी.
पिंजणे - फाडणे, विस्कटून मोकळा करणे.
गदिमांची बैठक जमली होती. पांढर्‍याशुभ्र गाद्या, लोड तक्के सज्ज होते. दोन दिग्गज कलाकार कवी ग.दि.माडगूळकर व संगीतकार पु.ल.देशपांडे 'देवबाप्पा' चित्रपटाच्या कामाला लागले होते, पण काम सोडून भलतीच मस्ती चालली होती..

'पु.ल' चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन गदिमांना चालीचे वजन ध्यानात येई. मग त्या तालावर झुलायला सुरुवात. बैठकीवर उगीचच लोळपाटणे. पोटाशी गिरदी धरुन त्याच्यावर चिमट्यात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढ्यात ठेवून कातरायला सुरवात. मग अडकित्याची चिपळी करुन ताल.. नाना तर्‍हा !

"स्वामी, असं वळण हवं."
"फूल्देस्पांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहावे."

एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे, इथे गीत आकाराला येते आहे, की नुसताच पोरकटपणा चाललाय ! एखादे दांडगे मूल पहावे तसे वाटत असे. त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे.

"माडगूळकर, आता आपला पोरकटपणा बास झाला. आता काम करुयात, उद्या गाण्याचे रेकॉर्डिंग आहे व अजून तुम्ही गाणं दिलेले नाही !"

"फूल्देस्पांडे, तुम्हाला गाणं कसं हवं ते सांगा?"
"मला बालगीत हवं आहे व चाल साधारण 'नाच ग घुमा, कशी मी नाचू?' सारखी आहे."
गदिमा उत्तरले, "घ्या लिहून.. नाच रे मोरा, आंब्याच्या वनात.. नाच रे मोरा नाच" व एका अजरामर गीताचा जन्म झाला !

पुण्यातल्या शेतकी महाविद्यालयात 'देवबाप्पा' चित्रपटाच शुटिंग चालू होत. बालकलाकार 'मेधा गुप्ते' आपल्या छोट्या सवंगड्यांसोबत नटून तयार होती. दिग्दर्शक राम गबाले सर्व व्यवस्था पहात होते. 'नाच रे मोरा' बालगीत चित्रित होणार होते. त्यासाठी मोराचा पिसारा हवा होता पण काही केल्या पुण्यात मोराची पिसेच मिळेनात. आता झाली पंचाईत. करायचं काय? शुटींगची तर सर्व तयारी झाली होती. शेवटी दिग्दर्शक राम गबाले यांनी यावर उपाय शोधला व शेतकी महाविद्यालयातल्या एका माळ्याला सांगून झाडाच्या मोठ्या पानांचा पिसारा करुन घेतला व या सुप्रसिध्द गाण्याचे शुटिंग मोराच्या पिसार्‍याशिवाय पार पडलं !

पुढे मेधा गुप्ते मोठ्या झाल्यावर सुध्दा या गीताने त्यांचा पिच्छा सोडला नाही ! त्या कॉलेज मध्ये जात असताना त्यांना चिडवण्यासाठी त्यावेळची कॉलेजमधली पोरं त्या दिसल्या की हे गाणं म्हणायला लागायची, अशी दिलखुलास कबुली त्याच मुलांमध्ये असणार्‍या एका मुलाने दिली आहे, ते म्हणजे, कर्‍हाडचे माजी खासदार व आत्ता सिक्कीमचे राज्यपाल असलेले श्रीनिवासजी पाटील यांनी !

लहानांपासून ते मोठ्यांच्या मनात दडलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्यांचे लाडके गाणे !..
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.