A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नदीकिनारी नदीकिनारी (१)

नदीकिनारी नदीकिनारी नदीकिनारी, ग!

दुसरे तिसरे नव्हते कोणी
तुझेच हसले डोळे दोन्ही
अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी, ग!

जरा निळ्या अन्‌ जरा काजळी
ढगात होती सांज पांगली
ढवळी ढवळी वर बगळ्याची संथ भरारी, ग!

सळसळली ग हिरवी साडी
तिनेच केली तुझी चहाडी
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी, ग!

वहात होते पिसाट वारे
तशात मी उडविले फवारे
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी, ग!

कुजबुजली भंवताली राने
रात्र म्हणाली चंचल गाणे
गुडघाभर पाण्यांत दिवाणे दोन फरारी, ग!