A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको प्रिया छेड काढू

नको प्रिया छेड काढू, नको मला ओढू
माझ्या अंतरीचे नको सूर छेडू

अनामिक ओढ माझ्या मनामध्ये जागे
तुला पुन्हा भेटायाची हुरहुर लागे
तुझ्या रेशमी बंधांनी अशी नकोनको प्रीत जोडू

फुलायाची हौस नाही, कळी गोड वाटे
स्वप्‍न एक मंतरलेले लोचनांत दाटे
प्रिया खेळ हा रंगला असा नकोनको खंड पाडू
दूरदर्शनवर खूप अदलाबदल झाली होती. ज्योतिर्धर देसाईची अहमदाबादला ट्रान्सफर झाली होती. त्यांनी सगळ्या कार्यक्रमांच्या टेप्स पुसून टाकल्या होत्या. 'शामे गजल' हा कार्यक्रम करणारे बी. के. गिरी ह्यांनी एक दिवस कार्यक्रम करायला सांगितलं. प्रश्न पुन्हा आला 'आर्टिस्ट कोणाला घ्यावे?' त्यांनी एक सांगितलं की एकच आर्टिस्ट घ्या नि तीन गजल गाऊन घ्या. त्यानंतर मी दिलराज कौरचा फोन मिळवला नि तिच्या घरी गेलो. गजला दूरदर्शनकडून मिळत नसतात. त्यासाठी तुमचा अभ्यास नि संग्रहही लागतो. गजला माझ्याकडे नेहमी तयार असतात. दिलराजसाठी ३ निवडल्या. प्रत्येक गजल गाऊन दाखवली की ती नवर्‍याला बोलवायची "अजी, देखिए । कितनी अच्छी है ।" तो पडला गुजराती. तो ऐकायचा नि निघून जायचा. तसा एरवी स्वभावाने चांगला होता. बिझनेसमन होता पण उर्दूचे शब्द त्याच्या बिझनेसमध्ये बसायचे नाहीत; पण गाण्याला त्याचा विरोध कधीच नव्हता.

'देर लगी आनेमें तुझको, शुकर है फिर भी आए तो’ ही अंदलिब शादानीची गजल प्रथम घेतली. दुसरी 'क्या यह भी जिंदगी है की राहत कभी न हो' ही गजल आरजू लखनवीधीची. नि तिसरी होती ’जमाना याद तेरा' (कृष्णमोहन) ही गजल. या कार्यक्रमाचं संचलन मराठी चित्रपटातली मुस्लीम हिरॉईन सुरेखा ही होती. तिने उर्दू मामूकडून (तिचा मामा) लिहून आणलं होतं. नि घरून घोकंपट्टी करून आली होती. प्रथम तिने दिलराजला काही प्रश्न विचारले नि मला एकच. तो असा "आज के इन गजलों के मूसीकार हैं, श्रीकांत ठाकरे. श्रीकांतजी आपसे पुछती हूं की ठाकरे इस मुनसिबत ये जाहीर होता है के आपकी मादरी जबान मराठी हैं । फिर आप दाग, मोमिन, गालिब इनके उर्दू शायरी की तरफ कैसे पहुंचे?" मी शांतपणे जवाब दिला तो असा, "दुनिया की रफ्तार कितनी तेज चल रही है, आदमी यहाँ से चाँद तक पहुंचा है, फिर मैं उर्दू जबान तक पहुँचा तो इसमें क्या हुआ?" हा जबाव पाठ केलेला नव्हता. तिच्या मामूकडून घोकंपट्टी करून आलेला नव्हता. आयत्या वेळी जे सांगायचं ते सांगून गेलो. याला शब्दसामर्थ नि भाषेवर प्रभुत्व लागतं. तिच्या विचारलेल्या प्रश्नानंतर मी विचारू शकत होतो की तुम्ही इथं जे नाव घेतलं ही फसवणूक आहे. कारण सुरेखा या नावानं 'मुंबईचा जावई' या नि अनेक मराठी चित्रात कामं केली ते कसं ? पण कार्यक्रमात पुढे गडबड झाली असती कारण ती गडबडली असती.

यानंतर दिलराजकडून मराठी गाणी म्हणवून घेतली एच.एम.व्ही. साठी. त्यात 'भेटही झाली तुझी अन् गंधता आली जिवा' नि 'नको प्रिया छेड काढू नको मला ओढू.' या गाण्यात एक गम्मत झाली. याचा मुखडा मी व्हायलिनवर वाजवला होता रेडिओवर, तो एक नवीन प्रयोग होता. त्याचा मुखडा रेडिओवर गाणारा यवन मांजरेकर याने एका पंजाबी स्टाईलच्या गाण्याने सुचवला होता. 'कमलि किता डोळा, आपिता सोना कमली वसुधा.' त्याचा अर्थ त्यालाच ठावूक नव्हता तर मला कसा माहीत असणार? ती तर्ज कित्येक वर्ष माझ्या डोक्यात होती नि ती लोकांसमोर यायची धडपड करीत होती. दिलराजवर गाणं करायचं डोक्यात आल्यावर ती तर्ज पटकन पुढे आली नि म्हणाली ही मुलगी गाईल !

मी काणेकरांना गाणं करायला सांगितलं. 'नको प्रिया छेड काढू' हे गाणं लिहिलं. त्यात एके ठिकाणी ’तुला पुन्हा भेटण्याची हुरहूर लागे' हे पंजाबी स्टाईलने गायला सांगितलं तर ती म्हणाली, "नहीं मैं नहीं गाऊँगी, क्यों कि मैंने जैसे आपने गाके बताया वो पंजाबी स्टाईल से गाई तो लोग ये मेरी गलती समझेंगे । क्योंकि मैं पंजाबी हूं । नहीं, आप मुझे मराठी में गाके सुनाईएगा, वो मेरी होशियारी समझेंगे ।" मी विचार केला ती जी म्हणते, यात तथ्य आहे. मी तो विचार सोडला. आर्टिस्टही खूष झाली.
(संपादित)

श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.