A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको साजणी दूर देशात

नको साजणी दूर देशात नेऊ,
नको जीव लावू ! नको जीव घेऊ !

शिरी उंच आभाळ, हा माळ खाली
किती काळचे हे सखेसोबती
खुळ्य़ा या जळाच्या निळ्या हुंदक्यांच्या
मला जागविती सदा नौबती
कळे ना मला ते नको गीत गाऊ
नको जीव लावू ! नको जीव घेऊ !

स्वत:शीच संभाषणे अन्‌ दिशांचे-
कधी वेडवूनि मला हासणे
असे एक काळोख हा ओळखीचा
जयाला न माहीत आश्वासने
नको पौर्णिमेचे सखी स्वप्‍न दावू
नको जीव लावू ! नको जीव घेऊ !

उरी शाप साही, तरी तो न दाही
सराईत झालो आता मी तया
बरी वेदना ही पुरी जी इमानी
सवे माझिया जायची जी लया
सुखे ही क्षणाची नको आज देऊ
नको जीव लावू ! नको जीव घेऊ !
गीत - वसंत निनावे
संगीत - बाळ बर्वे
स्वर- रवींद्र साठे
गीत प्रकार - भावगीत
नौबत - मोठा नगारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.