A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको वळुन बघू माघारी

नको वळुन बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी

तुझ्या नि माझ्या प्रीतिची रे संगती
घेऊन शिदोरी आठवणींची

तुझी लाडकी उनाड होडी
बघुन समिंदर होइल वेडी
आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी

नाही सोबती तुझ्या संगती
एकटाच तू दर्यावरती
बघुन तुला रे येतिल वरती रत्‍नं सुंदर किती
त्यामधे नाही तुझी राणी, पाहुनी होशिल खिन्‍न मनी

कशी खुळी ती आभाळातुनी
नक्षत्रं ही तुला हेरुनी
डोळे मोडुनि नाचुनी चमकुनी
येतिल खाली जरी रे
आठवेल रे झोपडीतली मिणमिणती चांदणी
'नको वळून'चा मुखडा मला अनिल विश्वासच्या 'मोरे अंगना में छिटकी चाँदनी' या नरेंद्र शर्मा यांच्या एका फिल्मी गीताच्या चालीवरून सुचला. अर्थात त्यात गाण्याच्या अर्थानुसार काही आवश्यक फेरफार करणे आवश्यक होते. पण पुढील चालीची रचना माझी आहे. देसकार रागाचे स्वर या चालीत गोवले गेले आहेत.

समुद्रकाठावरून गलबत घेऊन जाणार्‍या आपल्या प्रियकराला हाक घालू त्याची प्रेयसी गाणे म्हणते अशी सुरुवात असल्याने हाक घालण्याचा एक आलाप होकारात घालणे जरुरीचे होते. तसा आलाप घालून आणि त्याचे लक्ष वेधून त्याला 'निश्चिंत खुशाल जा' असे ती प्रेयसी म्हणते. गाण्याचा दर्यावर्दी झोका या गीताच्या रचनेत आहे आणि तो चाल लावण्यात व म्हणण्यात उतरवला आहे.
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत - रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई

  इतर संदर्भ लेख

 

  ज्योत्‍स्‍ना भोळे