A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाविका रे वारा वाहे रे

नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज नाव रे
सांजवेळ झाली आता, पैल माझे गाव रे

आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनी गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे

नवा साज ल्यायले मी, गौरीवाणी सजले मी, चांदवा ल्याला
माझा जिवू उरामंदी फुलुनी आला
नाचते रे बघ माझे तन, संगं त्याच्या भाव रे
सुमनांजली

सुमनताईंचा प्रांजल, नितळ आवाज. भावनांचं संयत सादरीकरण.
ह्या आवाजाने कधी प्रसिद्धीचा हव्यास केला नाही की ’मीच एक’ असा तोरा मिरवला नाही.
सगळं कसं मधुर आणि प्रामाणिक.

सुमन कल्याणपूर यांच्या ’आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही’, ’मज नकोत अश्रू घाम हवा’, 'या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार’, ’पाटीवरती गिरवा अक्षर’ या आमच्या आईच्या आवडीच्या गीतांनी लहानपणी, अगदी नकळत, मूल्य प्रणालीचा पाया घातला.

मला मात्र भावतात त्या त्यांच्या somber mood मधील गीतांल्या हलक्या, छोट्या-छोट्या, ज्या संगीतकार शिकवू शकत नाही अशा जागा. असं गाण्यासाठी मनाची तरलता हवी. ही पदे तशी अनवट आहेत. उदा. ’आठवे अजुनी यमुनातीर’, ’सांज आली दूरातून’, ’झरा प्रीतीचा का असा आटतो रे’, ’प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे’..

अशोक परांजपे - अशोक पत्की - सुमन कल्याणपूर हे नक्षत्र मराठी भावगीतांच्या अवकाशात दिमाखाने चमकत राहील. या त्रिकूटाचे ’नाविका रे वारा वाहे रे’ हे गीत असंख्य शाळकरी मुलींनी गाऊन, अपली कन्या पुढे जाऊन गायिका होईल, ही आशा त्यांच्या पालकांच्या मनात जागृत केली असेल. जसे की हे गीत म्हणजे भावगीत गायन शिकण्याचा श्रीगणेशाच.

अर्थात, ’केशवा माधवा’, ’अजून नाही जागी राधा’, ’शब्द शब्द जपून ठेव’, ’जगी ज्यास कोणी नाही’, असं खूप काही.. कालातीत.

आदरांजली आणि श्रद्धांजली.
🙏🙏🙏

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.