A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निरांजन पडले तबकात

निरांजन पडले तबकात
बाळ तर गेला समरात

क्षणाआधी तर तेवत होती
पूजेमधली प्रशांत ज्योती
दृष्ट कुणाची लागुन का ती-
विझली निमिषांत

ओवाळुनही झाली नव्हती
तोच उधळली मंगल आरती
का पडली बाळाची आहुती-
संगर-यज्ञात

रागरागिणी आळवुन झाली
आयुष्याची कविता सरली
दुर्दैवाने माता बसली-
भैरवी आळवीत

परक्यांना करण्यास्तव तर्पण
फूल पोटीचे केले अर्पण
निर्माल्याला तुडवु नका पण-
सोडा गंगेत

आता मज द्या शव तरी आणुनी
झाकिन ते मी ऊर फाडुनी
भडाग्‍नि शोकानले देउनी-
निजेन सरणांत
गीत - बाबुराव गोखले
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
तर्पण - तिलांजली.
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.
भडाग्‍नि - प्रेतास दिलेला मंत्रविरहित अग्‍नी.
शोकानले - शोकाग्‍नी.
संगर - युद्ध.