हृदयात दाटलेली भावांजली वहाते
आले दुरुनी येथे घेउनी सूर कंठी
जणू विठ्ठलाघरी ये दिंडीच वाळवंटी
रसिकांत देव माझा दिनरात मी पहाते
माझी फुले सुरांची मधुबोल गंध देती
आलाप छंद घेता निमिषात धुंद होती
बांधोनि भावपूजा मी भाग्यवंत होते
जनमानसांत देवा दिसशी समोर जेव्हा
हृदयात दाटुनी ये आनंदपूर तेव्हा
शतजन्म हेच राहो अपुले अभंग नाते
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | बेगम परवीन सुल्ताना |
राग | - | तिलंग |
गीत प्रकार | - | भावगीत |
निमिष | - | पापणी लवण्यास लागणारा काळ. |
अशा मोठ्या गायिकेकरिता कोणाला स्वररचना करायला आवडणार नाही? अप्पासाहेबांबरोबर झालेल्या गप्पांत मला असं उमगलं, की भीमसेन जोशींप्रमाणे त्यांनाही त्या जातीचा एखादा अभंग गायला आवडेल. मी अप्पांना म्हटलं, "पुढच्या महिन्यात त्यांचं पुण्याला गाणं आहे म्हणता, त्यावेळीच आकाशवाणीकरितां त्यांचं एक गाणं करू असा त्यांना निरोप द्या."
एखादा छानसा अभंग त्या बाईंकरिता स्वरबद्ध करावा असं मनाने घेतलं. नामदेवांचा एक अभंग निवडलाही, 'माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी'. चालही केली. बाई येतील पुण्याला त्यावेळी त्यांना सांगू असं ठरवलं. आणि लवकरच बाईंचा निरोप आला की "मी पुण्याला येते आहे अमुक अमुक दिवशी. आल्यावर फोन करते."
बाईंचा फोन आला. मी म्हटलं, "एक दिवस तालीम आणि एक दिवस ध्वनिमुद्रण असे दोन दिवस तरी काढायला हवेत तुम्हाला."
"त्या तयारीनेच आलेली आहे मी. मला अडचण नाही." बाईंचे उत्तर.
गाणं तयार होतं, तेव्हा मी म्हणालो, "उद्या दुपारी ३ वाजता आकाशवाणीवर भेटू तर मग."
त्यांच्या रेकॉर्डिंगसंबंधीचे सगळे सरकारी सोपस्कार मी पूर्ण करून ठेवले होतेच. आता गाण्याला उजाळा द्यायला लागलो. आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. या अफगाण स्त्रीला आपण नामदेव महाराजांचा अभंग सांगणार आहोत. गाताना उच्चारांत काही गडबड झाली, तर आपली खैर नाही. काय करावं? उद्या गाणं तर सांगायलाच पाहिजे. दुसरं एखादं काव्य निवडावं का? अनेक विचार डोक्यात यायला लागले.
कवी गंगाधर महाम्बरे यांची एक रचना विचाराधीन होती, 'रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते'. पण ती पूर्ण झालेली नव्हती. काव्य आणि चाल दोन्हीही दृष्टीने, स्वररचनेसंबंधी थोडंफार डोक्यात होतं इतकंच. विचार पक्का केला, की हेच गाणं करायचं. महाम्बरे यांना निरोप दिला. "उद्या सकाळी १० वाजता येतो." असा त्यांचा निरोप आल्याने दुसरे दिवशीच त्यांचेबरोबर बसणे शक्य होते. पण सगळं जमायचं होतं. दुसरे दिवशी ते आले आणि तास दोन तासांत बाईंच्या गळ्याला शोभेल अशी चाल तयार झाली. शब्दही ठीक जमले.
बाई येणार आहेत आकाशवाणीवर रिहर्सलकरिता, ही बातमी कशी कोणास ठाऊक त्यांच्या काही चाहत्यांना कळली. एक दोघांचे फोन आले, "आम्ही आलो तर चालेल का?" खरं म्हणजे तालमीच्या वेळी श्रोते असले, तर थोडे अडचणीचे होते. पण फोन आलेली मंडळी खरी गाण्याची प्रेमी होती. मातब्बर होती. त्यांना नकार देणं शक्य नव्हतं.
ठरल्याप्रमाणे बाई आल्या. मी गाणं सांगायला सुरुवात केली. बाई एकतानतेने गाणं टिपीत होत्या. एका जागेवर जरा अडल्यासारखं झालं त्यांना. पण त्या जागेवर त्या फार रेंगाळल्या नाहीत. मला म्हणाल्या, "मैं कर लूंगी, आप आगे चलिये." ह्या त्यांच्या शब्दात मला त्यांची समयसूचकता आणि त्यांचा आत्मविश्वास यांचं उत्तम दर्शन झालं.
दुसरे दिवशी ध्वनिमुद्रणाचे वेळी तर बाईंची एकतानता विलक्षण होती. अत्यंत कसोशीने, जिद्दीने आणि ओलाव्याने त्यांनी हे गाणं म्हटलं आहे. आमच्या 'स्वरचित्रा'ला एक उत्तम गाणं मिळालं होतं. ’स्वरचित्रा’त ते ध्वनिक्षेपित झालं आणि मला अनेक पत्र आणि फोन आले. लोकांनी ते गाणं खूपच उचललं. ख्यातनाम गायिका ज्योत्स्ना भोळे यांचाही मला खास अभिनंदनाचा फोन आला. संगीतातल्या आणखी दोन बड्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत.
त्याच सुमाराला बाबूजी पुण्यात आले होते. मला भेटायला ऑफिसात आले. मी त्यांना ते गाणं ऐकवलं. ते म्हणाले, "गाणं उत्तम जमलं आहे. परभाषिक असून बाईंनी खूपच छान म्हटलं आहे. किती वेळ तालीम चालली होती?"
असंच एकदा अण्णा चितळकर- सी. रामचंद्र आले होते माझ्याकडे. त्यांनाही ऐकवलं. ते म्हणाले, "भय्या, गाना बहोत बढिया बनाया है आपने और बाईभी ऐसी गायी है, की पूछो मत. उन्होने झोंक दिया है." ते इतके खूष झाले होते, की त्यांनी मला आग्रहाने घरी नेलं आणि आमची मैफिल जमली.
पुढे बाई ते गाणं मैफिलीत गाऊ लागल्या. त्यांनाही ते खूप भावलं असावं. ते गाणं ध्वनिक्षेपित झाल्यानंतर अगदी थोड्या दिवसांनी बाईची पुण्याच्या लक्ष्मी क्रीडा-मंदिरात बैठक होती. काही कामामुळे मला गाण्याला जायला उशीर झाला होता. मी हॉलमध्ये शिरलो त्यावेळी 'रसिका तुझ्याचसाठी' हे गाणं सुरू झालं होतं. त्या गाण्याच्या स्मृती तशा ताज्या होत्या. मला हॉलमध्ये पाहिल्यावर लांबूनच त्यांनी मला समोर येऊन बसण्याचं आवाहन केलं. श्रोत्यांच्या नजरा काही क्षण का होईना माझ्यावर केंद्रित झाल्या.
नंतरनंतर तर महाराष्ट्रातल्या त्यांच्या प्रत्येक मैफिलीत त्यांना या गाण्याची फर्माइश होऊ लागली. सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या वेळच्या त्यांच्या गाण्यातही त्यांनी एकदा ते म्हटलं. त्याचा व्हीडिओ निघाला आणि जनतेच्या स्मृतिपटलावर ते गाणं कोरलं गेलं. गाणं प्रथम ध्वनिक्षेपित होऊन २० वर्ष होऊन गेली. तरीही बाई आजही ते ठिकठिकाणी गातात.
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.