A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाचूच्या रानात झिम्मड

पाचूच्या रानात झिम्मड पाऊस, उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी, वाळूत चांदणचुरा

पिवळी पिवळी बिट्ट्याची काचोळी नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे फेसांचे साजिरे सजल्या सागरलाटा
इथल्या रानात तसाच मनात झरतो मायेचा झरा

आंब्याला मोहर बकुळी बहर, कहर चाफा फुले
माडाच्या सांदीला झाडाच्या फांदीला इवला खोपा झुले
बोलतो कोकिळ त्याच्या ग मंजुळ तोंडाला नाही थारा

गंधीत धुंदीत सायली-चमेली, लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा पिंपळ पसारा जिवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
खोपा - घरटे.
सांदी - कोपरा / अंगण, परसु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मनिषा जोशी, कल्याणी पांडे-साळुंके