A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पहा पहा मंजुळा हा

लयास गेली युगायुगांची हीन दीन अवकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला
शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला
बहरली कणसं इमानी माणसं नाचतो जोंधळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

त्रिसरणाची झडप तयाला कुंपण पंचशीला
बुद्धं सरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला
मिटते भ्रांती मिळते शांती खुलवी जीवनकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

बोधिवृक्ष हे डुलती कैसे बांधाबांधावरी
गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी
मळा हा राखू फळे ही चाखू, झरा बाजूला निळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

कोल्हेकुई ही कुपाकुपानं चाले बाहेरून
दुहीचा कुंदा वरती डोके काढितो आतून
हरेन्द्रासंगं धरूया दोघं हाती एकीचा विळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा
कुंद - एक प्रकारचे सुवासीक, पांढरे फुल / एक प्रकारचे गवत / स्थिर हवा.
कूप - कुंपण.
त्रिशरण - बुद्ध, धर्म आणि संघ या त्रिरत्‍नांना शरण जाणे.
पंचशील - बुद्ध धर्मातील पंचशील- १. हिंसेपासून अलिप्‍त राहणे, २. चोरी करण्यापासून अलिप्‍त राहणे, ३. व्याभिचारापासून अलिप्‍त राहणे, ४. खोटे बोलण्यापासून अलिप्‍त राहणे, ५. मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्‍त राहणे.
बोधिवृक्ष - ज्ञानाचा वृक्ष. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला असलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम यांना इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान) प्राप्‍ती होऊन ते बुद्ध झाले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.