A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाहिली काय वेलींनो

पाहिली काय वेलींनो तन्वंगी माझी सीता?
देखिली काय वृक्षांनो शालीन धरेची दुहिता?

हे ताल तरुंनो तुमची गगनाला शीर्षे भिडली
आकाशपथी ती तुमच्या दृष्टीस कशी ना पडली
उत्तुंग गिरींनो कोठे टेकिला सतीने माथा

मेघांनो तुम्हाही का वैदेही दिसली नाही
जाणीव पुण्यस्पर्शाची पवना तुज झाली नाही
बोलली नाही का काही, ती व्योमपथाने जाता?

निष्पाप आसवे कैसी झेलली फुलांनो नाही?
हे विहंगमांनो सांगा तिजविषयी वार्ता काही
एकटा जटायु का रे साक्षीस त्रिभुवनी होता?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - यशवंत देव
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• नृत्यनाटिका 'कथा ही राम-जानकीची' मधील पद.
जटायु - पक्षिराज. रावण सीतेस पळवून नेत असता हा त्याच्याशी लढला. यानेच रामाला रावणाने सीता लंकेत नेली असे सांगितले.
तन्वंगी - नाजूक व सुंदर स्‍त्री.
ताल - घराचा मजला / ताडाचा वृक्ष.
दुहिता - कन्या.
वैदेही - सीता. विदेह (जनक) याची कन्या.
व्योम - आकाश.
विहंग - विहग, पक्षी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.