A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पतित तूं पावना

पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥

तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥

याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥

मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायीं ॥४॥
गीत - संत कान्होपात्रा
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वराविष्कार- मधुवंती दांडेकर
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - झिंझोटी
ताल-केरवा
गीत प्रकार - नाट्यसंगीत, संतवाणी, विठ्ठल विठ्ठल
ब्रीद - प्रतिज्ञा.
याती - जात.
रसिकांचे सेवेशी

प्रख्यात 'गंधर्व नाटक मंडळी'चे मालक, गायन व अभिनयसम्राट नट श्री. नारायणराव राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' यांनी नाटक लिहिण्याविषयी मला आज्ञा केली, त्या आज्ञेला अनुसरून मी प्रस्तुत 'संत कान्होपात्रा' नाटक लिहिले, सदरहु नाटकाकरिता कान्होपात्रेची जी चरित्रविषयक माहिती मिळविता आली, ती अशी,
१. संतचरित्रकार माहिपतिबाबा यांच्या 'भक्तिविजयांत'तील ३६वा अध्याय
२. श्री. ज. र. आजगांवकर संपादित 'महाराष्ट्र-कवि-चरित्रा'च्या तिसर्‍या भागात आलेला भक्तिविजयां'तील ३९ व्या अध्यायाचा गद्यात्मक गोषवारा आणि कान्होपात्रेचे अभंग.
३. इंदिरा प्रेस संपादित 'सकल संत गाथे'मधील कान्होपात्रेचे काही अभंग.
४. प्रो. आर. डी. रानडे, एम. ए. संपादित 'अध्यात्म-ग्रंथमाले'चा ग्रंथांक २, संतवचनामृत, या भागास जोडलेल्या विद्वत्ताप्रच्युर प्रस्तावनेत कान्होपात्रेच्या चरित्राची सारांशरूप दिलेली पुढील माहिती.
५. कान्होपात्रा ही मंगळवेढे येथील शामा नावाच्या एका दासीची मुलगी. ती फार सुंदर असल्याने, आपल्या योग्यतेनुरुप ज्याचे रूप असेल त्यास तिने वावरण्याचा निश्चय केला होता. विठ्ठलाखेरीज तिची प्रीति दुसर्‍यावर जाईना. बेदरच्या बादशहाने आपल्या राजगृहात तिला सक्तीने बोलावले असता त्याजकडे जाण्यापेक्षा मृत्यू बरा, असे वाटून तिने पंढरपुरास विठ्ठलासमोर देह ठेविला. ही गोष्ट शके १३९० मध्ये घडली असे दिसते.
६. श्रीमत कविवर्य मोरोपंत यांच्या सन्माणिमालेतील कान्होपात्र विषयक पुढील आर्यार्ध-

॥ कान्होपात्रा श्रीमाद्विविठ्ठलरूपी समानता पावे ॥

'संत कान्होपात्रा' नाटकाला आधारभूत अशी खरीखुरी ही एवढी एकच ओळ. कान्होपात्रा, शामा, कान्होपात्राचे अभंग, चोखामेळ्याचे अभंग, हे खरेखुरे घेण्याचा प्रयत्‍न केला आहे.

चोखामेळा कान्होपात्रेपूर्वी सुमारे दीडशे वर्षे अगोदर होऊन गेला आहे. पण तोही मंगळवेढ्याचाच होता. त्याचीच परंपरा चालविणारा चोखा मी निर्माण केला आहे. चोख वागणारा तो चोखा. अजूनही वारकरी मार्ग पत्करणार्‍या अस्पृश्यास 'चोख' म्हणतात. कान्होपात्रा पतित तर चोखामेळा अस्पृश्य. पण दोघेही भूमिकेने ज्येष्ठ म्हणूनच नाटकात त्यांची सांगड घालाविशी वाटली. त्याशिवाय नाटकातील सर्व वातावरण माझ्या अल्पमतीप्रमाणे काल्पनिकच तयार केले आहे.

कान्होपात्रेचे बरेच अभंग विषयाला परिपोषक होतील असेच घेतले आहे. त्याचप्रमाणे श्रीज्ञानदेव, श्रीनामदेव व श्रीसंत चोखामेळा यांच्याही अभंगाचा उपयोग यथाप्रमाणे करून घेतला आहे. संतांच्या प्रासादिक अभंगवाणीचा लाभ अनायसे मिळाल्यामुळे त्या बाबतीत संतांनीच मला निर्भय केले आहे.
आता भय राहिले ते माझ्या गद्य-पद्य भागाविषयी !

हे नाटक ज्यांनी आपल्या प्रेमळ आज्ञेनें मजकडून लिहून घेऊन, आणि तनु-मन-धनानें अत्यंत आनंदानें झटून व आपल्या वैभवशाली रंगभूमीवर आणून मला श्रेष्ठपदाला चढविलें, त्या श्री. बालगंधर्व यांचे, आणि ज्यांनी, हितकर्त्या वडिल बंधूंच्या प्रेमळ अधिकारानें अगर्दी माझ्या हाताला धरून रंगभूमीला योग्य असें नाटक तयार करविलें आणि अगदी निर्लोभपणानें व निरलसपणानें, श्री. बालगंधर्वांनी मला दिलेले श्रेष्ठपद कायम यशस्वी व्हावें म्हणून नाटक शिकविण्यांत अविश्रांत श्रम घेतले, त्या अभिनय सम्राट श्री. गणपतराव बोडस यांचे सर्वांआधीं विनयपूर्वक सहस्रशः आभार मानलेच पाहिजेत.

त्यांच्यानंतर, नाटकांतील संगीत भाग सजविण्यासाठीं व नाटकांतील अभंगांना रागदारीची जोड देण्यासाठी प्रामुख्यानें तत्पर राहणारे, कै. भास्करबुवा बखले यांचे पट्टशिष्य, संगीतकलानिधि श्री. मास्तर कृष्णराव यांचा व कै. पं. विष्णुबुवा पलुस्कर यांचे पट्टशिष्य संगीतचूडामणि श्री. विनायकराव पटवर्धन यांनी आपल्या भूमिकेकरितां दिलेल्या चालीबद्दल त्यांचाही साभार उल्लेख केला पाहिजे.

शेवटीं ज्या ज्या ग्रंथकारांच्या ग्रंथांनी मला सदर नाट्यलेखनास मार्ग दाखविला, त्या सर्व ग्रंथकारांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानीत आहे.

आतां ज्यांचे मी आभार मानावयाचे नाहीत, पण ज्यांच्या चरणी निरंतर सानंद भक्तिभावाने अश्रूंचा अभिषेकच करावयाचा, ते म्हणजे जिचे नाट्यरूपांत नामसंकीर्तन केलें आहे ती संत कान्होपात्रा, व तिच्या नामसंकीर्तनासाठी आपल्या देवळासह 'गंधर्व मंडळी'च्या रंगभूमीवर अवतीर्ण होणारी जगाची मायमाऊली विठाई, आणि माझ्या बोबड्या बोलाचे कौतुक करणारा ईश्वरस्वरूप रसिक वर्ग ! त्यांच्याच विराटस्वरूपाच्या सेवेत सानंद व साभिमान लीन असणारा नम्र-
(संपादित)

नारायण विनायक कुलकर्णी
'संत कान्होपात्रा' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मधुवंती दांडेकर
  बालगंधर्व