A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाऊस कधींचा पडतो

पाऊस कधींचा पडतो
झाडांची हलती पानें;
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुरानें.

डोळ्यांत उतरतें पाणी
पाण्यावर डोळे फिरती;
रक्ताचा उडला पारा..
या नितळ उतरणीवरती.

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला?
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला..

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा;
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा !
गीत - ग्रेस
संगीत - यशवंत देव
स्वराविष्कार- पद्मजा फेणाणी-जोगळेकर
अरुण दाते
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
अल्बम - ही शुभ्र फुलांची ज्वाला
गीत प्रकार - ऋतू बरवा, भावगीत
संदिग्ध - अस्पष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पद्मजा फेणाणी-जोगळेकर
  अरुण दाते