A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पेटवी लंका हनुमंत

लीलया उडुनी गगनांत
पेटवी लंका हनुमंत

नगाकार घन दिसे मारुती
विजेपरी तें पुच्छ मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करी महावात

या शिखराहुन त्या गेहावर
कंदुकसा तो उडे कपीवर
शिरे गवाक्षीं पुच्छ भयंकर
चालला नगर चेतवीत

भडके मंदिर, पेटे गोपुर
द्वार कडाडुन वाजे भेसुर
रडे, ओरडे, तों अंतःपुर
प्रकाशीं बुडे वस्तुजात

जळे धडधडा ओळ घरांची
राख कोसळे आकारांची
चिता भडकली जणूं पुराची
राक्षसी करिती आकांत

कुणी जळाले निजल्या ठायीं
जळत पळत कुणि मार्गी येई
कुणि भीतीनें अवाक होई
ओळखी नुरल्या प्रलयांत

माय लेकरां टाकुन धावे
लोक विसरले नातीं नावें
उभें तेवढें पडें आडवें
अचानक आला कल्पांत

खड्गे ढाली पार वितळल्या
वीरवृत्ति तर सदेह जळल्या
ज्वाळेमाजीं ज्वाळा मिळाल्या
सघनता होय भस्मसात

वारा अग्‍नी, अग्‍नी वारा,
नुरे निवारा, नाहीं थारा
जळल्या वेशी, जळे पहारा
नाचतो अनल मूर्तिमंत
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मालकंस
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ५/१/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी जोशी.
अंत:पुर - राणीवसा, अंतर्गृह, माजघर.
अनल - अग्‍नी.
कंदुक - चेंडू.
कपी - वानर.
कल्पांत - आकांत, कल्पाचा (ब्रह्मदेवाचा एक अहोरात्र दिवस, चार अब्ज बत्तीस कोटी सौर वर्षे) शेवट.
गवाक्ष - जाळी / खिडकी.
गेह - घर.
गोपुर - देवळाचे मुख्य दार.
चेतवणे - उद्दीपित करणे, पेटवणे.
ठाय - स्थान, ठिकाण.
नुरणे - न उरणे.
वात - वायु.
सघन - सामर्थ्यवान.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण