दरीखोर्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी
संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास
दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | लक्ष्मीची पाऊले |
राग | - | मिश्र भैरवी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
दरीखोर्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश
ही कविता लिहिली त्या क्षणी तिचा प्रवास इतका दूरवर होणार आहे आणि असंख्य काव्यरसिकांच्या हृदयापर्यंत ती इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या खोलवर पोहोचणार आहे याची कणभरही कल्पना स्वत: कवीला आली नव्हती. अर्थात पुढे हे सगळं झालं याचं श्रेय त्याचं एकट्याचं नाही. संगीतकार श्रीधर फडके, गायक कलाकार सुधीर फडके आणि आशा भोसले, तसंच आकाशवाणी, दूरदर्शन ही प्रभावी माध्यमं आणि नंतर ते गाणं दूरवर पोहोचवणारे अनेक मराठी वाद्यवृंदसमूह.. या सर्वांचा या यशातील सहभाग फार मोलाचा आहे. अर्थात, कवितेचं गाणं झाल्यानंतरचा तो पुढचा प्रवास आहे. पण मुळात कवीच्या नजरेतून ती त्याची केवळ व्यक्तीगत कविताच होती आणि आजही आहे. त्यामुळे एक कविता म्हणून तिचा समावेश जेव्हा शालेय पाठ्यपुस्तकात झाला तेव्हा त्याला खूप आनंद झाला तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि आनंदाबरोबरच त्या कवितेतील एक अंत:प्रवाह स्वत: कवीला नव्याने जाणवू लागला. तो म्हणजे त्या कवितेत व्यापून राहिलेल्या प्रकाशतत्त्वाला आतून लगडलेलं कवीच्या अंतर्मानातलं, मौल्यवान, लोभस काळोखाचं सुप्त भान.. शालेय विद्यार्थ्यांशी या कवितेसंदर्भात केलेल्या सहज गप्पातून ही गोष्ट कवीला स्वत:ला प्रथम जाणवली आणि नंतर पुढेही विशेषत: कुमार वयातील मुलामुलींशी बोलताना ती जाणीव तो कटाक्षाने अधोरेखित करीत राहिला.
कवितेत व्यक्त होणारी विधाने निर्विवाद सत्य नसतात. ती सापेक्ष असतात. कवितेचं मूळ सांगणं, स्पष्ट करणं हा त्यांचा हेतू असतो. 'फिटे अंधारचे जाळे' ही पहिलीच ओळ त्याची निदर्शक आहे. उगवत्या प्रकाशाची अपूर्वाई अधिक उत्कट करण्यासाठी अंधाराचे जाळे ही प्रतिमा आली आहे. अन्यथा काळोख ही मुळीच असुंदर, अशुभ गोष्ट नाही. ते विश्वरहस्यातलं अटळ स्वयंभू सत्य आहे. किंबहुना ते प्रकाशाचं जन्म स्थान मानायला हवं. खरं तर मूळ कवितेल्या एका ओळीत ही जाणिव आपसूक व्यक्त झालेली दिसते. 'झाला आजचा प्रकाश.. जुना कालचा काळोख.. ' हे भान जागं झाल्यावर मग जाणवलं.. की आपल्या समग्र काव्य-प्रवासात हे अनोखं काळोख-भान आपल्याला अखंड सोबत करीत आलं आहे.
शब्दांच्या काळोखात
शब्दांना तीव्र सुगंध
शब्दांच्या काळोखात
शब्दांचे कूजन मंद
ही 'शब्दधून' मधली अभिव्यक्ती ही या जाणिवेची वानगी.
हे काळाखाचे इतके तरंग मनावर उमटत असताना खोल आत जाणवत की या सर्वांहून निराळा असा एक काळोखाचा तुकडा आपल्या फार जिव्हाळ्याचा आहे. कारण तो खास आपल्या एकट्याचा आहे. जणू आपल्या खाजगी मालकीचा आहे. त्याची तुलना करायची झालीच, तर कदाचित; आईच्या गर्भातील उबदार आश्वासक आणि संवर्धक काळोखाशीच करता येईल. तो आपल्याला कधी, कुठे भेटला..?
शोध घ्यायला हवा.. नक्कीच घ्यायला हवा.
(संपादित)
सुधीर मोघे
कविता सखी
सौजन्य- परम मित्र पब्लिकेशन्स्, ठाणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.