A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रभो मज एकच वर

प्रभो, मज एकच वर द्यावा
या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा

कधिं न चळावे चंचल हें मन
श्रीरामा, या चरणांपासुन
जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा

रामकथा नित वदनें गावी
रामकथा या श्रवणीं यावी
श्रीरामा, मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा

पावन अपुलें चरित्र वीरा
सांगुं देत मज देव अप्सरा
श्रवणार्थी प्रभु, अमरपणा या दीनासी यावा

मेघासम मी अखंड प्राशिन
असेल तेथुन श्रीरामायण
मेघापरी मी शतधारांनीं करीन वर्षावा

रामकथेचें चिंतन गायन
तें रामांचें अमूर्त दर्शन
इच्छामात्रें या दासातें रघुकुलदीप दिसावा

जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन नित रामायण
सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा

असंख्य वदनें, असंख्य भाषा
सकलांची मज एकच आशा
श्रीरामांचा चरित्र-गौरव त्यांनी सांगावा

सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी
फिरेन अवनीं, फिरेन गगनी
स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र पहाडी
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २९/३/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- राम फाटक.
अवनि - पृथ्वी.
ठाय - स्थान, ठिकाण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण