A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रीतफुले माझी सोनेरी

प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी !
रुमझुम ओठांत येती लकेरी
माझ्या घरी मी आले फिरून
कणाकणामधून रातराणी फुलून
मला मनोमनी वाटे
घर माझे ग, माझे !
प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी !

हे माझे घर, जागे नवी भावना
ओढ लागे नवी गोड संवेदना
आज माझ्या मना स्वर्ग वाटे उणा
स्वर्ग माझा मला भेटला भूवरी
प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी !

ये चाहूल नवी कोण ये जीवनी?
कोण छेडीतसे ही नवी रागिणी?
कंप गात्रांतुनी, गीत मौनातुनी
सूर झंकारती प्राणवीणेवरी !
प्रीतफुले माझी सोनेरी !
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - सलील चौधरी
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - सूनबाई
गीत प्रकार - चित्रगीत
गात्र - शरीराचा अवयव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.