A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रामचंद्र स्वामी माझा

भाग १-
रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा

राम सज्जनांचा त्राता, हाती धनु पृष्ठी भाता
राम दुर्जनांचा वैरी, राम त्राटिकेसी मारी

रामे धनुष्य मोडिले, नाते सीतेशी जोडिले
राम जानकीचा नाथ, पराक्रमी पुण्यव्रत

राम वनवासी झाला, पितृवचनी गुंतला
रामे भुलावण केली, शूर्पणखा विटंबिली
राम शूर शिरोमणी, एकपत्‍नी एकबाणी

भाग २-
रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा

रामा राक्षसे भोवली, सीता दशानने नेली
राम लोचने पेटली, रामे निर्दाळिला वाली
राम किष्किंधेसी आला, सखा सुग्रीवाचा झाला

रामे सैन्ये मेळविली, चाल लंकेवरी केली
राम आला राम आला, रामे सागर जिंकीला
रामा आडिवतो कोण? जळी पडले पाषाण
मरू घातला रावण, मार्ग चाले 'रामायण'
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - यशवंत देव
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - भक्तीगीत, राम निरंजन
  
टीप -
• 'कथा राम-जानकीची' या रंगमंचीय कार्यक्रमातून.
आनन - मुख, तोंड.
किष्किंधा - वाली व सुग्रीव यांचा देश. म्हैसूर व हैद्राबाद यांच्यामध्ये.
ताटिका - त्राटिका. सुकेतुयक्षाची कन्‍या. मारिच व सुबाहू राक्षसांची माता.
निर्दलन - निर्दळण, निर्दाळण. नायनाट, संपूर्ण नाश.
पृष्ट(ष्ठ) - पाठ.
भाता - बाण ठेवण्याची पिशवी.
शूर्पणखा - रावणाची बहीण.
सुग्रीव - एक वानर. वालीचा भाऊ. यांस वालीने पदच्युत केले होते.