A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राया मला जवळी घ्या ना

तुमच्यावरती मीच भाळले, घडला माझा गुन्हा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा!

नेसले आजला शालु हिरवा नवा
सहवास राजसा तुमचा मजला हवा
रात चांदणी मोत्यावाणी, येळ चालला सुना
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा!

घ्या विडा केशरी माझ्या हातातुनी
ऐन्यात पाहते मुखडा न्याहाळुनी
तुमच्या हाती हात गुंफिता, मदन करितो खुणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा!

स्वभाव तुमचा ठसला माझ्या मनी
मज आवडते ही संगत तुमची धनी
राघुसंगे मैना लाडकी, मलाच तुमची म्हणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा!
गीत- म. पां. भावे
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर - सुलोचना चव्हाण
गीत प्रकार - लावणी