A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रुणझुणत्या पांखरा (३)

रुणझुणत्या पांखरा रे, जा माझ्या माहेरा रे, जा माझ्या माहेरा

सांग माझ्या आईला रे, सांग बापाला रे, सांग माझ्या बापाला
ने मला माहेरा रे, ने मला माहेरा रे, ने मला माहेरा

सोन्याची सुपली, मोत्यानं गुंफली, तिथं माझ्या वन्सं खेळत होत्या
वन्सं वन्सं मला आलं मूळ, धाडताय काय हो माहेरा?
गुणाची गौरी मला काय पुसतीस, पूस जा अपुल्या दिराला

सोन्याचा चेंडू, रूप्याचा दांडू, तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भाऊजी भाऊजी मला आलं मूळ, धाडताय काय हो माहेरा?
गुणाची गौरी मला काय पुसतीस, पूस जा अपुल्या जावंला

सोन्याची रवी, रूप्याचा डेरा, तिथं आमच्या जाऊबाई ताक करित होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ, धाडताय काय हो माहेरा?
गुणाची गौरी मला काय पुसतीस, पूस जा अपुल्या सासर्‍याला

सोन्याची सहाण, रूप्याचं खोड, तिथं आमचे मामंजी पूजा करित होते
मामंजी मामंजी मला आलं मूळ, धाडताय काय हो माहेरा?
गुणाची गौरी मला काय पुसतीस, पूस जा अपुल्या सासूला

सोन्याचा करंडा, रूप्याचा आरसा, तिथं आमच्या सासूबाई कुंकू लावित होत्या
सासूबाई सासूबाई मला आलं मूळ, धाडताय काय हो माहेरा?
गुणाची गौरी मला काय पुसतीस, पूस जा अपुल्या नवर्‍याला

सोन्याचा पलंग, रेशमाची गादी, तिथं आमचे पतीदेव झोपले होते
पतीदेव पतीदेव मला आलं मूळ, धाडताय काय हो माहेरा?
गुणाची लाडकी मला काय पुसतीस, पूस जा आपल्या मनाला !
गीत -
संगीत - शाहीर साबळे
स्वर- शाहीर साबळे
गीत प्रकार - लोकगीत
डेरा - रांजण.
मूळ येणे - सासरी गेलेल्या मुलीला जाणारे माहेरचे बोलावणे.
सुपली - लहान सूप.