A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सा- सागर उसळे कैसा

शुभारंभ करू सारे आपण
मिळुनी घेऊ संगीत शिक्षण

सुरू कशाने होते शिक्षण?
ग म भ न

संगीताचा आरंभ कसा?
संगीताचा आरंभ असा
सा रे ग म प ध नि सां

सा सा सा
सागर करितो आवाज कैसा?

सा सा सा
सागरास त्या येता भरती
बुडुनी जाती पार किनारे
रे रे रे
चढत्या लाटांवरी तरंगत
गलबत चाले घेउनी वेग
ग ग ग
गर्जत वाढी सिंधू दुर्गम
मनुष्य करतो संगर अंतीम
म म म
पडाव येती इवले झप झप
तोडीत पाणी लाटा सप सप
प प प
धरणी गाठी माणूस सावध
ना तर सागर करता पारध
ध ध ध
नीलमण्यांच्या सुरसावाणी
उसंबळे वर पाणी पाणी
नि नि नि
सारे सारे सरे शेवटी
भरती नंतर पुन्हा ओहोटी

'सा' सागर उसळे कैसा
'रे' रेती बुडवी किनारे
'ग' गलबत चाले लगबग
'म' मनुष्य वादळी दुर्गम
'प' पडाव येती झप झप
'ध' धरणी गाठी सावध
'नी' निळ्या सागरी पोहुनी
सात स्वरांची ही कहाणी !

सागर- सा
रेती- रे
गलबत- ग
मनुष्य- म
पडाव- प
धरणी- ध
नीलम- नि
सात स्वरांची ही कहाणी

अचूक स्वरांवर गाता अक्षर
जन्मा येते गीत मनोहर
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर- आशा भोसले
चित्रपट - काका मला वाचवा
गीत प्रकार - बालगीत, चित्रगीत
  
टीप -
• 'Sound of Music' या आंग्‍ल चित्रपटाच्या theme songच्या धर्तीचे मराठी गाणे.
गलबत - जहाज.
पडाव - सैन्याचा तळ / नाव, होडी.
संगर - युद्ध.
सुरसा - दोन टोकांचा खिळा.
सिंधु - समुद्र.