A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सैनिक हो तुमच्यासाठी

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी

वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी

आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडून या इकडे वार्तासह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी

उगवला दिवस मावळतो, अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणास घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी
गात्र - शरीराचा अवयव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.