A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखि भावगीत माझें

सखि भावगीत माझें, तुजसाठिं गाइयेलें
तूं नाहिं ऐकियेलें !

हृदयांत वेदनांची सरिता अखंड वाहे
तीरीं तिच्या बसोनी तुजसाठिं गुंफियेलें
तूं नाहिं ऐकियेलें !

गेलें सखे विरोनी तें गीत अंतराळीं
परि त्याचिया स्मृतीनें होतात नेत्र ओले
तूं नाहिं पाहियेलें !
गीत - वसंत हेबळे
संगीत - पंडितराव नगरकर
स्वर- पंडितराव नगरकर
नाटक - देहूरोड
गीत प्रकार - नाट्यसंगीत
सरिता - नदी.
या 'देहूरोड' नाटकातील मूळ कल्पना बालमोहन मंडळीचे प्रथितयश नट, रूपसुंदर बापुराव माने यांची 'बच्चा नवरा' या नाटकातील त्यांनी प्रथमच केलेली नायकाची भूमिका पाहून सुचलेली आहे. इतके दिवसांची नायिका एकदम नायक झालेली पाहून बापुरावांच्या नाट्याभिनयाबद्दल मला वाटणारे कौतुक द्विगुणित झाले व त्या भरांत, सध्याच्या युद्धकालीन परिस्थितीमुळे स्त्रिया पुरषांच्या बरोबरीने कामे करीत असलेल्या नव्या नव्या दृश्यांची भर पडली आणि मी हे नाटक लिहिले. अर्थातच या नाटकात कुठल्याही तत्त्वांची चर्चा केली नसून, समाजाला अगर राष्ट्राला संदेश देण्याची मुळीच खटपट केलेली नाही. दिवसभर काबाडकष्ट केलेल्या रसिक प्रेक्षकांच्या दमल्या-भागल्या मनाची थोडी फार सात्त्विक करमणूक करावी एवढाच या 'देहूरोड'चा साधा हेतु आहे.

स्वतः बापुराव माने यांनी मला या धांदलात अभंग गोळा करण्यासाठी आपली 'तुकारामाची गाथा' वाचावयास लावल्याबद्दल आणि योग्य त्या सूचना केल्याबद्दल मी त्यांचा खरोखरच आभारी आहे.

या नाटकांतील पदांना कर्णमधुर चाली देऊन पद्यविभाग रचतांना माझ्याबरोबर बैठकी मारून महाराष्ट्राचे लाडके कलावंत, सुप्रसिद्ध रेडियो स्टार पंडितराव नगरकर यांनी मला उपकृत केले आहे. आणि त्याचप्रमाणे प्रस्तुत नाटकांत 'सखि भावगीत माझें…' हे आपले गोड भावगीत म्हणण्याची व प्रसिद्ध करण्याची परवानगी दिल्याबद्दल गुजरातचे प्रथितयश कवि वसंतराव हेबळे यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.
(संपादित)

गोपाळ लक्ष्मण आपटे
दि. २५ नोव्हेंबर १९४४
'देहूरोड' या संगीत नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- य. गो. जोशी प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.