A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
समाधि साधन संजीवन

समाधि साधन संजीवन नाम ।
शांति दया सम सर्वांभूतीं ॥१॥

शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू ।
हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥

शम-दम-कळा, विज्ञान-सज्ञान ।
परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥

ज्ञानदेवा सिद्धी-साधन अवीट ।
भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - मधुकर गोळवलकर
स्वर- सुधीर फडके
राग - यमन
गीत प्रकार - संतवाणी
कळा - युक्‍ती, कौशल्य.
दम - इंद्रियनिग्रह.
पैं - निश्चय्यार्थक.
शम - मनोनिग्रह.
संजीवन - पुनुरुज्‍जीवन.
भावार्थ-

केवळ परमेश्वराचे नामस्मरण व्यक्तीला विश्वाशी एकरूप कसे करू शकते याचा प्रत्‍यय देणारा हा अभंग आहे. हरिनामाचे सामर्थ्य एवढे आहे की, त्यायोगे मनात सार्‍या प्राणिमात्राविषयी प्रेम आणि दया उत्‍पन्‍न होते. एवढेच नाही, तर अलौकिक अशा शांततेचा लाभ होतो. ही अलौकिक शांती म्हणजेच चिरंतन समाधी होय. निरंतर समाधिसुख मिळवून देणारे काही असेल तर ते परमेश्वरी नामस्मरणच होय. या नामस्मरणामुळे ज्ञान-विज्ञानाची प्राप्ती होते. विकार आणि अज्ञान कधी फिरकतही नाहीत. हा सिद्धीचा अवीट मार्ग आपणाला शांतीचे परमरूप निवृत्तीनाथ यांनीच दाखविला आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.