A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
समाधिस्त येथें बैसले ज्ञानेश

थरारून येई रोमांच शरीरी
झळक इथें ही अशी कांही न्यारी
प्रकाशा दिपवी असा हा प्रकाश
समाधिस्त येथें बैसले ज्ञानेश!

जीवनाचा अंत होऊनियां खालीं
पडे देह तैसा इथें नाही खालीं
इथें रोमरोमीं जीव मूर्तिमंत
धरुनी विसांवे चैतन्य अनंत

प्रसादास येथें मिळत प्रसाद
पडसाद ऐके मुळांतली साद
प्रतीतीस होत प्रतीत प्रतीती
आणि स्फूर्तिलागीं येत असे स्फूर्ति

एका जनदिनी मिळाले भांडार
ऐकुनियां आला कुणी हा पामर
नसे संत कोणी भाविक ना भक्त
असे जीव मात्र जीवनी आसक्त

तळमळ कांही धरूनिया पोटी
मिटलेल्या ओठी रिकाम्याच ताटीं
तयावरतीहि कांही कृपा करा
उघडा थोडीसी ताटी ज्ञानेश्वरा!

तुमच्या स्मरणें उचंबळे मन
तुमच्या वाणींचे करीत चिंतन
तुमच्या चरणीं मस्तक ठेविलें
उचलावयाचे भान ना राहिले!
गीत- कवि अनिल
संगीत - आनंद मोडक
स्वर - रवींद्र साठे
गीत प्रकार - भावगीत
ताटी - कुंपण, बांध.
प्रतीती - अनुभव.