A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांगा ह्या वेडीला

सांगा ह्या वेडीला, माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला

तुला न्यावयाला ग घेऊन गाडी
आलो सर्व सोडून मी शेतवाडी
तू असताना जोडीला
या बुरख्याच्या गाडीला
नवा रंग येईल गुलाबी साडीला
सांगा या वेडीला!

अहो सांगा ह्या वेड्याला, माझ्या घरधन्याला
कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला

ही गाडी कुणाची, शेतवाडी कुणाची?
बढाई नका ठोकू मोठेपणाची
सांगा या खोपडीला, नाही काणा झोपडीला
कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला
सांगा या वेड्याला!

बरे नाही तुझे माहेरी रहाणे
तू गावात बदनाम होशील याने
तुझ्या वाडवडिला अन्‌ धर्मरूढीला
हे घातक होईल पुढच्या पिढीला
सांगा या वेडीला!

आहे थोरवी थोर माझ्या पिढीची
भली आज गावात इज्जत पित्याची
आहे मान त्याला अन्‌ त्याच्या पगडीला
अरे हसतील सारे तुझ्या रे परवडीला
सांगा या वेड्याला!

नको भांडू, भांडण विकोपास जाईल
तुझा-माझा तंटा मी पंचात नेईल
बसेन चावडीला, त्या पंचांच्या जोडीला
तुला मात्र नेईन मी याच घडीला
सांगा या वेडीला!
चावडी - पंचायत कचेरी.

 

Random song suggestion
  मधुबाला जव्हेरी, विठ्ठल शिंदे