A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सन्मित्र राघवांचा सुग्रीव

साक्षीस व्योम, पृथ्वी, साक्षीस अग्‍निज्वाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला

रामा, तुझ्यापरी मी वनवास भोगताहें
हनुमन्मुखें तुला तें साद्यंत ज्ञात आहे
दुःखीच साह्य होतो दुःखांत दुःखिताला

बंधूच होय वैरी, तुज काय सांगुं आर्या !
नेई हरून वाली माझी सुशील भार्या
वालीस राघवा, त्या तूं धाड रौरवाला

बाहूंत राहुच्या मी निस्तेज अंशुमाली
गतराज्य-लाभ होतां होईन शक्तिशाली
माझेंच शौर्य सांगूं माझ्या मुखें कशाला?

होतां फिरून माझें तें सैन्य वानरांचे
होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे
ते लंघतील सिंधू, खणतील शैलमाला

ते शोधितील सीता, संदेह यात नाहीं
निष्ठा प्लवंगमांची तूं लोचनेंच पाही
होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला

झालेच सख्य रामा, देतों करीं करातें
आतां कशास भ्यावे कोणा भयंकरातें?
तूं सिद्ध हो क्षमेंद्रा, वालीस मारण्याला

घालीन पालथी मी सारी धरा नृपाला
रामासमीप अंतीं आणीन जानकीला
धाडीन स्वर्ग-लोकीं येतील आड त्याला

हनुमान, नील, ऐका, मंत्री तुम्ही न माझे
सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे
आज्ञा प्रमाण यांची आतां मला, तुम्हांला
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - वृंदावनी सारंग
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २५/११/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- व्ही. एल्. इनामदार.
अंशुमाली - सूर्य.
आर्य - श्रेष्ठ / पूज्य/ स्वामी.
नृपाळ(ल) - राजा.
नील (नळ) - एक वानर. सुग्रीवाचा एक सेनापती. विश्वकर्मा पुत्र.
प्लवग - वानर.
भार्या - पत्‍नी.
राहु - एक ग्रह.
रौरव - नरक.
लंघणे (उल्लंघणे) - ओलांडणे, पार करणे.
व्योम - आकाश.
वाली - एक वानर. सुग्रीवाचा वडील भाऊ. किष्किंधा नरेश. याने सुग्रीव पत्‍नी रुमा हीचे हरण केले होते.
शैल - डोंगर, पर्वत.
सुग्रीव - एक वानर. वालीचा भाऊ. यांस वालीने पदच्युत केले होते.
साद्यंत - पूर्ण / सुरुवातीपासून शेवटपर्यंत.
सिंधु - समुद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण