A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सारखा काळ चालला पुढे

विश्वचक्र हे अविरत फिरते
मरणामधुनी जीवन सरते
अश्रू आजचे उद्या हासती नवल असे केवढे !
सारखा काळ चालला पुढे

कुणाचे कोणावाचून अडे?
सारखा काळ चालला पुढे

शिशिर नेतो हिरवी पाने
झाड उभे हे केविलवाणे
वसंत येता पुन्हा आगळा साज तयावर चढे
सारखा काळ चालला पुढे

श्रेष्ठ वीरनर इथे नांदले
रामकृष्णही आले-गेले
जग हे अडले त्यांच्यासाठी, असे न केव्हा घडे
सारखा काळ चालला पुढे

मरणारा तो जगास मुकतो
त्याच्यामागे कुणी न जातो
दु:ख उरी ते कवटाळुनिया नित्य कुणी का रडे?
सारखा काळ चालला पुढे
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - वसंत पवार
स्वर- मन्‍ना डे
चित्रपट - दोन घडीचा डाव
गीत प्रकार - चित्रगीत