A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सारेच हे उमाळे आधीच

सारेच हे उमाळे आधीच योजलेले
सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले !

सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !

मी हा भिकारडा अन्‌ माझी भिकार दु:खे;
त्यांचे हुशार अश्रू आधीच गाजलेले !

माझी जगावयाची आहे कुठे तयारी?
त्यांच्या नकोत युक्त्या जे जन्मताच मेले !

माझ्या शिळ्या भुकेची उष्टी कशास चर्चा?
जे घालतात भिक्षा तेही उभे भुकेले !

आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे?
येतात जे दिलासे तेही उगारलेले !
गीत - सुरेश भट
संगीत - गजानन वाटवे
स्वर-
गीत प्रकार - कविता
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
टोकाला जाऊन स्वत:ची इतकी निंदानालस्ती क्वचितच कुणा कवीने केली असेल. एका बाजूला आपल्या पराभवाबद्दलची ही इतकी धारदार खंत तर दुसर्‍या बाजूला स्वत:च्या वेगळेपणाचाही तितकाच रास्त गर्व. आपल्या दोषांचे जितके वेडेवाकडे दर्शन सुरेश भट घडवतात, तितकेच आपल्या सामर्थ्याविषयी कमालीच्या अस्मिताभावाने ते बोलतात. 'रंग माझा वेगळा' या गझलमध्ये ते म्हणतात,
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

स्वत:साठी, स्वत:च्या सुखासाठी नव्हे तर जगाला प्रकाश देण्यासाठी 'माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा' मी सूर्य आहे हे किती ताठ मानेने कवीने सांगितले आहे. आणि आपल्यात सामर्थ्य का आहे, आपला रंग जगाहून वेगळा का आहे, याचे उत्तरही कवीला मिळाले आहे. आपले सारे सामर्थ्य आपल्या गीतातच, आपल्या कवितेतच आणि आपल्या शब्दातच आहे, हे त्याला पुरेपूर समजले आहे-
कोटि कंठांतून माझी वैखरी घेईल ताना
शब्द हा एकेक माझा वेचुन घेतील तारे

आपल्या काव्यशक्तीबद्दलचा केवढा हा पराकोटीचा गर्व. आपले स्वत:चे आयुष्य विफल झाले तरी आपले कवन सफल झाले आहे. कारण ते लोकांची अंत:करणे जागी करण्यासाठी उच्चारले गेले आहे, हे कवी पुरतेपणी ओळखून आहे. पण हे त्याला स्वत:लाच जगापुढे आक्रोश करून सांगावे लागते आहे. तो ते सांगतो. हा छातीठोक बेगुमानपणा सुरेश भटांच्या गझलांमधून हळूहळू डोकावू लागला. उघडपणे बोलण्याचे धैर्य त्यांच्या गझलमध्ये जसे जसे आले तशी तशी तिची भाषा बदलू लागली. स्वत:च्या आयुष्याबद्दल प्रांजलपणे बोलायचे, तरी पण त्याच्यावरचे आवरण पुरते तर काढायचे नाही.. सुरेश भटांच्या भाषेत सांगायचे तर वस्त्रे तर फाडावयाची पण त्वचा सोलावयाची नाही. मग हे जीवनसत्य प्रकट कसे करणार? म्हणूनच ते आपल्या गझलमधून प्रतीकांची सूचक भाषा सतत वापरू लागले. 'विरले जगाचे रंग अन्‌ प्राणासही गेले तडे', 'पुसुनी मला जाती ऋतू', 'चुकुनी बसे चटका जशी माझ्यातुनी ठिणगी झडे', 'शेष माझे दिवस मी श्‍वासात ओवत राहिलो', 'मोडक्या दारापरी मी खिन्‍न वाजत राहिलो', 'घाव माझे गुलाबी मोहराया लागले', 'मी विजांचे घोट प्यालो'. जशी ते प्रतिकांची भाषा वापरू लागले तशी त्यांच्या गझलमध्ये अतिशयोक्तीही डोकावू लागली. 'चालू दे वक्षात माझ्या वादळांचे येरझारे' या शब्दांतून काळजातल्या तगमगीचे वाढवून सांगितलेले स्वरूप डोळ्यांसमोर येते. तशीच त्यांनी वापरलेली विशेषणे- 'लाघवी फुलांची लोचने', 'जिवंत कलेवर', 'दुभंगलेल्या उरात', 'बंडखोर गीते', 'शिळ्या भुकेची', 'हुशार अश्रू'. या विशेषणांच्या खैरातीमुळे त्यांची वर्णने एकदम शब्दांपलीकडचा आशय बोलून जातात. गझलमध्ये ठासून नाट्य उभे करण्याची कला कवीने प्राप्त करून घेतली आहे, ती या भाषेच्या करामतीमुळे-
सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !

जगाच्या धूर्त हिशोबीपणाचे आणि स्वत:च्या केविलवाण्या फसगतीचे हे बोलके चित्र कवीने अचूक उभे केले आहे. माझे दिवाळे काढून लोक गेले, हे शब्द उच्चारताच कवीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्‍ट होतो. केवळ एक घटना प्रतीक म्हणून वापरताच तिच्या पोटात दडलेला मूळ अर्थ कवितेतून स्पष्‍ट होतो. कवीची ही प्रतीकयोजना त्याच्या गझलची परिणामकारकता वाढवण्यासाठी फारच उपतुक्त ठरते.
(संपादित)

शिरीष पै
'सुरेश भट ह्यांची निवडक कविता' या शिरीष पै संपादित कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.