A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सती तू दिव्यरूप मैथिली

दिव्यत्वाला चुकले नाही दिव्य सदा भाळी
सती तू दिव्यरूप मैथिली!

सुमनाहुनि तू कुसुम कोमला
रामप्रभू तुज पती लाभला
वनवासाची चौदा वर्षे पतिव्रते भोगिली!

विजनवासिही रामप्रभूचे
सुख न लाभले सहवासाचे
वनवासातही लंकेमाजी वनवासी राहिली!

शेवट झाला दुष्ट रिपूंचा
कलंक उरला तुज परघरचा
म्हणुनि शुद्धते शुद्धीसाठी अग्‍निचिता स्पर्शिली!

रामराज्य ये आयोध्येवर
भाग्य अडखळे उंबरठ्यावर
लोकराधनेसाठी प्रभुने तुजलाही त्यागिली!

रामायणी तुज दिगंत कीर्ती
सोशिलेस तू पावन मूर्ती
भूमिसुता तू, दिव्यहि अंती, धरणीने रक्षिली!
मैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).
सुता - कन्या.