A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शत जन्म शोधितांना

शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई । मिठि घालुं मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - वझेबुवा
स्वराविष्कार- मास्टर दीनानाथ
पं. वसंतराव देशपांडे
प्रभाकर कारेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सन्यस्त खड्ग
राग - भैरवी
चाल-आखोंने तेरे गममें
गीत प्रकार - नाट्यसंगीत
आर्ति - दु:ख, पीडा.
या पदाचे रसग्रहण करताना सर्वप्रथम मला असे नमूद करावयाचे आहे की हे पद स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचं भरतवाक्य नाही. तसंच ते या नाटकाचे सार किंवा सारांशही नाही. अगदी मूलभूत स्तरावर ते एका विरहिणीचे भावगीत आहे.. एक प्रेमकविता आहे.
हे नीटसं समजण्यासाठी- आधी 'सन्यस्त खड्ग', त्याचे कथानक आणि नाटकातील ज्या पात्राच्या तोंडी हे पद येतं ती सुलोचना, यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ.

अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्‍नागिरीला स्थानबद्ध असताना सावरकरांनी 'सन्यस्त खड्ग' लिहिलं. या काळात त्यांना राजकारणात जाण्यास बंदी होती. तिथे त्यांनी भरपूर लिखाण केले. लेख, पुस्तके, नाटकही. लिखाणाचा उद्देश आपले विचार मांडणे हाच असल्याने, 'सन्यस्त खड्ग' हे नाटकसुद्धा सावरकारांची वैचारिक सुस्पष्टता घेऊन येते. नाटकाची कथा अहिंसा, धर्म, कर्म यांचा ऊहापोह करत, नाटकातील पात्रांद्वारे विचारांचे मंडन-खंडन करीत पुढे जाते. प्रमूख पात्रं आहेत- बुद्ध, विक्रमसिंह, वल्लभ आणि सुलोचना.

सिद्धार्थ गौतम 'बुद्ध' होऊन काही वर्ष लोटली आहेत. विक्रमसिंह हे बुद्धांच्या वडिलांच्या (शुद्धोदन) राज्याचे (शाक्य) सेनापती. बुद्धांच्या सांगण्यावरून ते शस्त्रसंन्यास घेतात. (पटत नसतानाही केवळ प्रयोग म्हणून.) तथागतांबरोबर भिक्षु म्हणून प्रवासास जातात. या घटनेला चाळीस वर्षे लोटतात. दरम्यान विक्रमसिंहांचा पुत्र वल्लभ राज्याचा सेनापती होतो. वल्लभ सुद्धा शूर, पराक्रमी आहे. या चाळीस वर्षात बुद्ध धर्माचा आणि त्यात सांगितलेल्या अहिंसेचा पुष्कळ प्रसार झाला आहे. तेवढ्यात शेजारच्या 'कोसला' राज्याचे शाक्यांवर आक्रमण होते. अहिंसामार्गी झालेल्या या राज्याची युद्धाची तयारी नसते. बरीच वाताहत होते. सेनापती वल्लभ पकडले जातात. ही वार्ता पोचताच विक्रमसिंह तथागतांच्या मनाविरुद्ध खड्ग निष्कोषित करतात आणि युद्धात सामिल होतात. जाताना ते बुद्धांना म्हणतात, "मी अहिंसा सोडत आहे, बुद्धांना नाही."

हे पद नाटकात सुलोचनेच्या तोंडी येतं. सुलोचना ही वल्लभ दयिता- पत्‍नी. त्यांच्या प्रीतिविवाहाला नुकतंच एक वर्ष झालंय. हा वाढदिवस साजरा करतानाच्या प्रेमसंवादात ती दोघे मग्‍न आहेत. तोच वल्लभास राजसभेचे तांतडीचे निमंत्रण येते आणि तो तिथून जातो. तो परत आल्यावर त्याच्याशी कसं बोलावं? रुसावं का? किती? या विचारात ती असतानाच दूत निरोप आणतो, सेनापती तर परस्पर युद्धावर गेले..
ही भेट अर्धीच राहिली याची तिला खंत सतावते. काही दिवसांतच अशीही बातमी येते की शाक्यांचे सैन्य उधळून गेले आणि सेनापती वल्लभ युद्धबंदी झाले. तेव्हा तिच्या तोंडी येते, ते हे पद.
शत जन्म शोधितांना..

या पदाचा संपूर्ण अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्या सावरकरांचा चष्मा घालावा लागेल. भावनेची तीव्रता, उत्कटता.. हातचं राखून काहीच नाही. भव्य, दिव्य, तेजस्वी.. आणि प्रखरही. स्वत: जळून इतरांस ऊर्जा देण्याचं सामर्थ्य असलेलं.

सुलोचना ही सामान्य राजस्‍नुषा नाही. फक्त प्रेमसंवादात तिचं मन रमत नाही. तो ती करतेच पण ती कर्तृत्ववान आहे. स्त्रीसुलभ भावनांबरोबर विचारांची परिपक्वता तिच्यात आहे. तिच्या जाणीवा प्रगल्भ आहेत. धैर्यधर पतीचा तिला अभिमान आहे. तो युद्धबंदी झाल्याचे समजताच तिचे पहिले वाक्य असते,
"हा सेनापती अबल आहे म्हणून पराभूत नाहीये तर-
सबल परि ना राष्ट्रचि म्हणून अपजयी हा । नसे जित पहा । सेनानि ।"
पुढे जाऊन ती सैनिक वेष घालून रणांगणात युद्ध करते व आपल्या पतीसह वीरमरण पत्करते.

ही अशी स्त्री जेव्हा एक विरहगीत गाईल आणि तेही सावरकरांच्या लेखणीतून उतरलेलं..
ती म्हणते,
शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

हा माझा माझ्या प्रियकराचा शोध जन्मजन्मांतरीचा आहे. जन्म-मरणाच्या अनेक फेर्‍यांतून गेलेला. माझ्या या शोधापुढे शत 'आर्ति' व्यर्थ आहेत. 'आर्ति' या शब्दाचा अर्थ जरी दु:ख, पीडा असला तरी इथे त्याची आर्तता थेट ज्ञानेश्वरांची आहे. 'विश्वाचे आर्त'शी नातं सांगणारी. दीपावली सुद्धा तुम्हा-आम्हासारखी मिणमिणत्या पणतींची नाही तर तेजाळ, देदिप्यमान सूर्यमालिकांची. इथे 'कवी' सावरकरांनी 'विझाल्या' असं म्हणताना 'विझल्या'तला कोरडेपणा काढून टाकला आहे. या माझ्या शोधयज्ञात मी अशा शत दीपावलींची आहुती दिली आहे, असे तिला वाटते.

तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥

प्रियकर मीलनाचे सायास तिला कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाही. तिच्यासाठी ही आनंदाने केलेली 'साधना' आहे, जिची सिद्धी आतां कुठे होऊ घातली आहे. येथे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा आणखी एक स्पर्ष जाणवतो. वरील दोन्ही ओळीतील 'गाठी' या शब्दाने त्यांनी यमक साधलाय आणि श्लेषही. पहिल्या ओळीतील 'गाठी' हे गाठभेट या अर्थाने येते तर दुसर्‍या ओळीतील 'गाठी' हे पोचणे या अर्थाने. युगायुगांच्या प्रतिक्षेनंतर आमची भेट घडली आहे तोच,

हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥

नुकतीच तर कुठे आमची भेट झाली आहे.. जो मी उठून त्याला, माझ्या प्रियकराला मिठी घालू पाहते, तोच सगळं संपून गेलं. मीलनाचा 'तो' क्षण एका क्षणांत संपून गेला..
पुलंनी एका ठिकाणी असं म्हंटलं आहे, "क्षण तो क्षणांत गेला - या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल पारितोषिक द्यावं, इतक्या श्रेष्ठ दर्जाची ही कवीकल्पना आहे."

'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा संदर्भ ठेऊन पाहिलं तर असा सगळा अर्थ आहे. पण या संदर्भाच्या पलीकडे जाऊन, अध्यात्मिक स्तरावरही हे पद फार खरं ठरतं.
मानवी जीवनातील दु:खाचं सातत्य, सुखाची क्षणभंगूरता, काळाची गतीमानता, बुद्ध धर्मात वर्णन केल्याप्रमाणे जीवनाचं 'अनित्य' असणं… असं बरंच काही.

सावरकरांच्या या पदरचनेचे आपल्या मनातील स्थान इतके अनन्य असे आहे की नुसतं 'शत जन्म..' म्हंटलं तरी हा सगळा अध्यात्मिक पट आपल्यासमोर उलगडतो.

(अधिक संदर्भासाठी 'मर्मबंधातली ठेव ही प्रेममय'वरील ब्लॉग वाचा.)

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मास्टर दीनानाथ
  पं. वसंतराव देशपांडे
  प्रभाकर कारेकर