A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट

मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी झाले आज विराट

पुरेत अश्रू दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही प्रतिभाशाली भाट
गीत - वसंत बापट
संगीत - कमलाकर भागवत
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
उल्का - आकाशातून पडलेला तारा.
क्रंदन - आकांत.
भाट - स्तुतिपाठक.
ललाट - कपाळ.
वेदि - उंच आसन / ओटा.