A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शिवजन्म पोवाडा

शिवनेरी किल्ला प्रख्यात । पुणे प्रांतात । अशा किल्ल्यात ।
हिंदवीराज्य संस्थापक खास । छत्रपति शिवाजी आला जन्मास । ऐका शाहीर गातो कवनास ॥

जसा प्रभू रामचंद्र व कृष्ण अवतार झाला, तसा महारष्ट्रात शहाजीराजे व जिजाईचे पोटी शिवअवतार होणार, असे दिल्लीपती बादशहाला कळताच-

अवताराचे मूळ मुळातून नष्ट होण्याला ।
गर्भवती जिजाबाईला कैद करण्याला ।
फर्माविले लखोजी जाधव, तिच्या बापाला ॥

पोटचा गोळा भोसल्याच्या कुळात देऊन, भोसल्याशी वैर मांडणारा लखोजी जाधव,

बादशहाचे वचन मानून ।
जहागिरीची आस धरून ।
मुलीवर गेला चालून, नाते विसरून ॥

ही बातमी लागता शहाजीला । संगे घेऊन जिजाबाईला । गाठला शिवनेरी किल्ला । योग्य स्थळ आहे प्रसूतीला । म्हणून ठेवले जिजाबाईला । पण तिथं सोडून जाण्याला । छाती होईना शहाजी राजाला । कारण, जाधवराव पाठी लागलेला । त्यात प्रसुतीकालही आला । मुलुखगिरीवर तर जाणे भाग शहाजीला ॥

जिजाबाई सती पतिव्रता ।
नवर्‍याची पाहुनी चिंता ।
बोलली स्पष्ट त्या वक्ता ।
तुम्ही तुमच्या मुलुखगिरीवर जावावे आता ॥

आणि काय? शहाजी राजे गेलेले पाहून जाधवरावांची स्वारी शिवनेरीवर येताच चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे जिजाबाई बापाच्या अंगावर जाऊन म्हणाली, "पहाता काय? पकडा. स्वत:च्या मुलीला परकियांच्या ताब्यात देऊन लाचार वृत्तीने तुकडे चघळणारे तुम्ही माझे बाप नसून वैरी आहात वैरी. मी तुमच्या समोर तुमची मुलगी म्हणून नव्हे तर शहाजीराजाची पत्‍नी म्हणून उभी आहे, पकडा."

मुलगी नव्हे देवी साकार ।
असा होऊन साक्षात्कार ।
जाधवराव जहाला गार ।
हातातील गळली तलवार ।
प्रेमाचा फुटला पाझर, दाटला ऊर ॥

जिजाबाईला जाधवरावांनी मायेने पोटाशी धरून, बाळंतपणाकरता माहेरी येण्याची विनवणी केली पण,

राजानी आणिले इथवर । शिवनेरीवर । हेच माहेर ।
शिवाई देवी माझी माता । पोटी झाला पुत्र शककर्ता ।
शाहीर पिराजी नमितो माथा ॥

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  शाहीर पिराजीराव सरनाईक