A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शिवा घे प्रसाद रामाचा

दिधला जरी तूं कैंचा घेऊं पत्कर राज्याचा
मी गोसावी नित्‌संचारी दास राघवाचा
शिवा घे प्रसाद रामाचा!

वैराग्याचें कसें मोहवी तुज मायजाल
स्वभावधर्मा सोडुनि कां कधिं सिद्धीप्रत जाल?
समष्टींत व्यक्तीचा लपला उजळ भावी काल
लौकिक वाढो उदंड जगतीं तव क्षात्रत्वाचा
शिवा घे प्रसाद रामाचा!

तव राज्या पाहून वाटतो स्वर्गा अभिमान
म्लेंच्छ बुडाले उदक लाभले करावया स्‍नान
आनंदभुवनीं या पुन्हां प्रगटला वेदोनारायण
नभांगणीं डौलांत फडफडो ध्वज रघुनाथाचा
शिवा घे प्रसाद रामाचा!

गडावरी गड जिंकुन केलें मायभूस मुक्त
कांचनगंगा झुळझुळतां नच उरे कोष रिक्त
रक्तसिंचनें अश्रुसिंचनें होतां अभिषिक्त
भावभरें नच घेतां संभव श्रेय लोपण्याचा
शिवा घे प्रसाद रामाचा!
गीत- श्रीराम आठवले
संगीत - गजानन वाटवे
स्वर - गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
अभिषिक्त - ज्याच्यावर अभिषेक झाला आहे असा, राजा.
उदक - पाणी.
क्षात्र - क्षत्रियासंबंधी.
समष्टी - समग्रता.