A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रीरंग सावळा तू

श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा
ही प्रीत दो जिवांची अद्वैत रे मुकुंदा

ये राधिके अशी ये होऊन प्रीति मुग्धा
नयनांतुनी फुलू दे अपुल्या अमोल छंदा

ये प्रेमले अशी ये, फुलवित सुप्रभाती
प्रणायातल्या सुरांनी सजवीत सांजराती
मिटल्या फुलापरी त्या तव नील लोचनांत
लावून भारलेली भावूक प्रीती-ज्योत

का लोचनी प्रिया रे हृदयी तुझेच रूप
दिनरात लाविते मी येथे तुझाच दीप
गाते तुझेच गाणे, कथनी तुझे उखाणे
तुझियाकडेच धावे मनपाखरू दिवाणे

येताच मी परंतु तुझिया समीप का गे
होसी अबोल वेडी विणशी मनात धागे
त्या चित्त पाखराला लपवून ठेविसी का
भारावुनी अशी या नेत्रांत पाहसी का

ते बोलके अबोल क्षण सर्व आठवावे
मम लाजर्‍या दिठीत सारेच साठवावे
हा छंद या जिवाला जडवी तुझीच मूर्ती
मी मंगलातुनी या गुंफी अभंग नाती