A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ते कसे ग ते कसे

ते कसे ग ते कसे?
देव्हार्‍यातिल देव जसे!

कोंदणातले ते रत्‍न जसे, तसेच त्यांचे तेज असे
पळभर माझ्यावाचुन त्यांना मुळीच बाई चैन नसे!
ते असे ग ते असे, देव्हार्‍यातिल देव जसे!

आणि सासरे तुझे कसे? मामंजी ग, बाई कसे?
रागिट चर्या, मनांत माया, मुळी वावगे खपत नसे
मामंजी ते बाई असे, फणसामधले गरे जसे!

आणि तुझी ती सासू कशी?
निर्मळ गंगामाय जशी
राग तयांचा आग परि त्या मायेलाही अंत नसे
सासुबाईंना 'आई' म्हणावे असेच मला वाटतसे!

नणंद बाई तुझी कशी?
लवंगी मिरची तिखट जशी
ठेंगणी ठुसकी, मुळांत रुसकी, नटण्यावाचून काम नसे
चुरुचुरू बोलतें, चहाड्या करतें, उणे सारखे काढितसे!

दीर तुझे ते बाई कसे, तुझे भाउजी सांग कसे?
आपण हसती, जगा हसविती, राग तयांचा येत नसे
भावावरती प्रेम असे की रामप्रभूंचे भरत जसे!
कोंदण - दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण.

 

  मालती पांडे ( बर्वे ), प्रमोदिनी देसाई