A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दर्यावरी डोले माझं

दर्यावरी डोले माझं चिमुकलं घरकुल
घेऊनिया पाठीवर जाई दूर गलबत

किती दिस किती राती मोजल्या ग कोणी बाई
किती गांव किती देस ओलांडले ठावं नाही

खाली जळ वरी आभाळ दिसे समोर क्षितिज
असे किती जाती दिस माझ्या रायाच्या सोबत

कधी बाई खवळुनी गरजतो समिंदर
बिलगते माझ्या राया सोडुनीया सारी लाज

पिठावाणी चांदण्यांत फेकुनीया जाळं दूर
बैसतो ग राया गात आपुल्या पिर्तीचं गीत

कधी बाई संपणार कोण जाणे मुशाफरी
जाईना का जल्म जळी आहे राया माझ्यापाशी
या गाण्यात दर्यावरील संथ डोलणे तंतोतंत उतरले आहे. 'दर्यावर डोले माझे..' येथे क्षणभर थांबून 'चिमुकले घरकुल' हे पुढील शब्द म्हणण्याने तो झोका जास्त स्पष्ट होतो. गाण्याची लय जास्त संथ आहे. त्यामुळे हा विराम अधिक बोलका झाला आहे. तसेच हा विराम पुढील ओळींत दोनदा - 'घेऊनिया', 'पाठीवर', 'जाई दूर गलबत' - घ्यावाच लागतो. तेव्हाच गाण्याचा हा झोका खुलतो आणि दर्यावर 'डोलणारे घरकुल' डोळ्यांसमोर उभे राहाते.

शांत पण अथांग समुद्रावर संथ डोलणारे हे घरकुल आहे. या गाण्याला अशा तर्‍हेने म्हणण्यानेच खटका-मुरक्यांपेक्षा जास्त उठाव येतो. त्याला सजावटीची फारशी जरूर नाही. शिवाय ही लोकगीतंच समजायची. त्यांच्या चाली लोकगीतांच्या ठेवणी प्रमाणे सरळ, सोप्या, काही स्वरांची पुनरुक्ती, अशाच गुणांनी युक्त असाव्या.
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत - रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई

  इतर संदर्भ लेख

 

Print option will come back soon